वृत्तसंस्था, नवी दिल्ली

या बातमीसह सर्व प्रिमियम कंटेंट मोफत वाचा

अमेरिका आणि चीनमध्ये व्यापार युद्धाचा भडका आणि जागतिक अर्थव्यवस्थेबाबत अनिश्चिततेच्या वाहत असलेल्या वाऱ्यामुळे सुरक्षित गुंतवणूक पर्याय असलेल्या सोन्याकडे गुंतवणूकदारांनी मोर्चा वळविला आहे. यातून आंतरराष्ट्रीय पातळीवर सोन्याचा भावाने शुक्रवारी प्रति औंस ३ हजार २०० डॉलरची पातळी ओलांडली. मुंबईत सोन्याचा भाव शुक्रवारी तोळ्यामागे ३,१९५ रुपयांनी वाढून ९३,३५५ रुपयांवर गेला, तर दिल्लीत ६,२५० रुपयांच्या उसळीसह त्याने ९६,४५० रुपयांचे अस्मान गाठले.

आंतरराष्ट्रीय वायदे बाजारात सोन्याचा भाव शुक्रवारी सकाळी प्रति औंस १.७ टक्क्यांनी वाढून ३ हजार २२७ डॉलरवर पोहोचला. त्यानंतर तो ३ हजार २३७ डॉलरच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला. तेथे मौल्यवान धातूंसाठी प्रचलित परिमाण औंस म्हणजे २८.३५ ग्रॅम इतके वजन भरते. चालू आठवड्यात सोन्याच्या भावात जवळपास ६ टक्के वाढ नोंदविण्यात आली आहे.

अमेरिकेतील वायदे बाजारात सोन्याचा भाव २ टक्क्यांनी वाढून ३ हजार २४६ डॉलरवर गेला. याचवेळी चांदीच्या भावातही प्रति औंस ०.८ टक्के वाढ होऊन तो ३१.४६ डॉलरवर गेला.अमरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चिनी वस्तूंवरील आयात शुल्क १४५ टक्क्यांपर्यंत वाढविले आहे. याला प्रत्युत्तर म्हणून चीनने शुक्रवारी अमेरिकेच्या वस्तूंवरील आयात शुल्क १३५ टक्क्यांवर नेले. व्यापार युद्ध पेटण्याचा धोका असून, जागतिक पुरवठा साखळीवर याचा विपरित परिणाम होण्याची शक्यता आहे. या अनिश्चित वातावरणामुळे शुक्रवारी जगभरात भांडवली बाजारात घसरण झाली आणि डॉलरही गडगडला. डॉलरचे मूल्य कमी झाल्याने गुंतवणूकदारांनी सोने खरेदी करण्यास प्राधान्य दिले. दुसरीकडे याच्याच परिणामी डॉलरच्या मूल्यातही घसरण होऊ लागली आहे.

देशांतर्गत ६,२५० रुपयांची उसळी

देशांतर्गत बाजारपेठेत सोन्याच्या भावाने शुक्रवारी ६ हजार २५० रुपयांची उसळी घेतली. दिल्लीत सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅमला ९६ हजार ४५० रुपयांवर पोहोचला. दिल्लीतील सराफा बाजारपेठेत सोन्याच्या भावाची ही सार्वकालिक उच्चांकी पातळी ठरली. मागील चार सत्रांत सोन्याच्या भावात घसरण झाली होती. आता सोन्याने चांदीच्या किलोमागील भावालाही मागे टाकले आहे. चांदीतही प्रति किलो २ हजार ३०० रुपये वाढ होऊन तो ९५ हजार ५०० रुपयांवर गेला, अशी माहिती ऑल इंडिया सराफा असोसिएशनने दिली. मुंबईच्या बाजारात सोन्याचा घाऊक भाव शुक्रवारी ३,१९५ रुपयांनी वाढून ९३,३५५ रुपयांवर गेला, तर चांदीच्या भावात किलोमागे २,२६० रुपयांची भर पडून तो ९२,९३० रुपयांवर पोहोचला.

वार्षिक २१ टक्के वाढ

गेल्या वर्षी वायदे बाजारात सोन्याचा भाव अनेकवेळा सार्वकालिक उच्चांकी पातळीवर पोहोचला आणि वर्षभरात त्यात २१ टक्के वाढ नोंदविण्यात आली. जागतिक पातळीवरील अनिश्चितता, मध्यवर्ती बँकांकडून वाढलेली मागणी आणि गोल्ड ईटीएफ योजनांमध्ये वाढलेला ओघ ही सोन्यातील तेजीची कारणे ठरली आहेत.

सोन्याच्या भावातील तेजी आगामी काळात कायम राहण्याची चिन्हे आहेत. पुढील काही महिन्यांत सोन्याचा भाव प्रति औंस ३,४०० ते ३,५०० डॉलरच्या दरम्यान राहण्याचा अंदाज आहे. – जिओव्हानी स्टाऊनोवो, विश्लेषक, यूबीएस

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gold rides a wave of uncertainty international price at 3200 dollars per ounce print eco news ssb