मुंबई: एप्रिल ते सप्टेंबर या सहामाहीत रिझर्व्ह बँकेने तिच्या देशांतर्गत सोन्याच्या साठ्यात १०२ मेट्रिक टनांची भर घातली आहे. मध्यवर्ती बँकेच्या तिजोरीत असलेल्या सोन्याचे एकूण प्रमाण ३० सप्टेंबरपर्यंत ५१०.४६ मेट्रिक टनांवर पोहोचले आहे, जे ३१ मार्च २०२४ अखेर ४०८ मेट्रिक टनांपेक्षा अधिक होते, अशी माहिती रिझर्व्ह बँकेने मंगळवारी दिली.
परकीय चलन साठा व्यवस्थापनासंबंधी अर्धवार्षिक अहवालानुसार, सहा महिन्यांच्या कालावधीत एकूण ८५४.७३ मेट्रिक टन सोन्याच्या साठ्यात आणखी ३२ मेट्रिक टनाची भर पडल्याचे मध्यवर्ती बँकेने म्हटले आहे. गेल्या काही वर्षांपासून भारत हळूहळू सोन्याचा साठा देशांतर्गत स्थानिक तिजोरीत हलवत आहे, जी आर्थिक राजधानी मुंबई आणि नागपुरात स्थित आहे. गेल्यावर्षी इंग्लंडमधून देशांत १०० मेट्रिक टन सोने मायदेशी आणले गेले होते.
हेही वाचा : Gold Price Today : धनत्रयोदशीच्या दिवशी सोन्याचा दर किती? जाणून घ्या, सोने चांदीचा भाव एका क्लिकवर
बँक ऑफ इंग्लंड आणि बँक फॉर इंटरनॅशनल सेटलमेंट्स (बीआयएस) यांच्याकडे भारताने ३२४.०१ मेट्रिक टन सोने सुरक्षित ठेवले होते आणि २०.२६ मेट्रिक टन सोन्याच्या ठेवींच्या स्वरूपात ठेवण्यात आले होते, असे रिझर्व्ह बँकेच्या खुलाशात म्हटले आहे. एकूण परकीय चलनाच्या साठ्यातील सोन्याचा वाटा मार्च २०२४ च्या अखेरीस ८.१५ टक्क्यांवरून सप्टेंबर २०२४ च्या अखेरीस सुमारे ९.३२ टक्क्यांपर्यंत वाढला आहे. रिझर्व्ह बँकेच्या वार्षिक अहवालानुसार, या वर्षी मार्चअखेरीस ४१३.७८ मेट्रिक टन सोने परदेशात होते. वर्ष २००९ मध्ये, भारताने आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून २०० टन सोने खरेदी केले होते.