IT Hardware PLI Scheme: आयटी हार्डवेअर (IT Hardware) क्षेत्रात लवकरच नवीन नोकऱ्या निर्माण होऊ शकतात. आयटी क्षेत्रातील दिग्गज Dell, HP, Lenovo, Foxconn इत्यादी २७ कंपन्यांना सरकारच्या प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह (PLI) योजनेसाठी मंजुरी मिळाली आहे. या संदर्भात माहिती देताना इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnaw) म्हणाले की, PLI IT हार्डवेअर योजने(PLI Hardware Scheme)द्वारे एकूण २७ कंपन्यांना मंजुरी मिळाली आहे.
२३ कंपन्या उत्पादन सुरू करीत आहेत
बिझनेस टुडेमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, पीएलआय योजनेंतर्गत मंजुरी मिळाल्यानंतर जवळपास ९५ टक्के कंपन्या पहिल्या दिवसापासून उत्पादन सुरू करणार आहेत. अशा स्थितीत २३ कंपन्या हे काम लवकरात लवकर करतील. उर्वरित चार कंपन्या येत्या ९० दिवसांत या योजनेअंतर्गत उत्पादन सुरू करतील, असंही अश्विनी वैष्णव यांनी सांगितले आहे.
५० हजारांहून अधिक नवीन रोजगार निर्माण होणार
या २७ कंपन्या आयटी हार्डवेअर योजनेद्वारे ३ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक आयटी हार्डवेअरमध्ये करणार असून, या गुंतवणुकीतून एकूण ५० हजार लोकांना थेट रोजगार मिळणार आहे. एकूण १.५० लाख लोकांना अप्रत्यक्षपणे रोजगार मिळणे अपेक्षित आहे, असंही आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनीही आशा व्यक्त केली आहे.
हेही वाचाः केवळ २६ टक्के भारतीय कंपन्या AI चा लाभ घेण्यासाठी तयार; सिस्को अभ्यासातून उघड
आयटी हार्डवेअर योजनेंतर्गत ज्या कंपन्यांना मंजुरी मिळाली आहे, त्यात डेल, फॉक्सकॉन, लेनोवो, फ्लेक्सट्रॉनिक्स, सोजो, व्हीव्हीडीएन, सिरमा, भगवती, पगेट, सोजो, निओलिंक या कंपन्यांचा समावेश आहे. देशात आयटी हार्डवेअरच्या निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने उत्पादन लिंक्ड प्रोत्साहन योजना २.० सुरू केली आहे. याद्वारे सरकार देशात आयटी हार्डवेअरच्या निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्याद्वारे या क्षेत्रात नवीन रोजगार निर्माण करण्यासाठी १७ हजार कोटी रुपये खर्च करणार आहे.