देशातील सर्वात लोकप्रिय डेअरी ब्रँड अमूलचे दूध आता महाग होणार नाही. सर्वसामान्यांसाठी ही एक मोठी दिलासा देणारी बातमी आहे, कारण काही दिवसांपासून दुधाचे दर सातत्याने वाढत आहेत. विशेषत: फुल क्रीम दुधाच्या वाढत्या किमतींमुळे सर्वसामान्यांना चांगलाच त्रास झाला आहे. अमूल ब्रँडचे व्यवस्थापन करणाऱ्या गुजरात को-ऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशननेही दुधाचे दर न वाढवण्याचे कारण स्पष्ट केले आहे. फेडरेशनचे व्यवस्थापकीय संचालक जयेन एस. मेहता यांनी बुधवारी सांगितले की, यंदा गुजरातमध्ये मान्सूनचा पाऊस वेळेवर झाला आहे. त्यामुळे परिस्थिती बऱ्यापैकी चांगली असून, दूध खरेदीचा हंगाम सुरू झाला आहे. अशा स्थितीत अमूल दुधाच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता नाही.
चाऱ्याचे भाव वाढण्याची भीती नाही
पीटीआयशी बोलताना जयेन एस. मेहता म्हणाले की, मान्सून वेळेवर दाखल झाल्याने दूध उत्पादक पशुपालकांवर चाऱ्याच्या वाढत्या किमतीचा ताण पडणार नाही. त्यामुळे दूध खरेदीचा हा चांगला हंगाम सुरू होत आहे. त्यामुळे आता दुधाच्या दरात वाढ अपेक्षित नाही. मेहता यांना येत्या काही महिन्यांत दुधाचे दर वाढण्याबाबत विचारण्यात आले.
हेही वाचाः GeM पोर्टलद्वारे १० मिनिटांत SMEs ना १० लाखांचे कर्ज मिळणार, ‘या’ दिवशी योजना सुरू होणार
गुंतवणुकीवर अमूलचा भर
अमूलच्या गुंतवणूक योजनांबाबत ते म्हणाले की, महासंघ दरवर्षी सुमारे ३ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करीत आहे. पुढील अनेक वर्षे हे असेच चालू राहील. देशात दुधाची खरेदी वाढवण्याबरोबरच प्रक्रिया सुविधा वाढवण्याचीही गरज आहे. अमूल लवकरच राजकोटमध्ये नवीन डेअरी प्लांट उभारण्याच्या तयारीत आहे. हा प्लांट दररोज २० लाख लिटर दुधावर प्रक्रिया करू शकणार आहे. राजकोट प्रकल्पावर किमान २ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे.
१० कोटी कुटुंबांची काळजी घेतली
युरोपियन युनियन (EU) आणि ब्रिटन यांसारख्या देशांबरोबर भारताने मुक्त व्यापार करार (FTAs) केला आहे किंवा तो लवकरच करणार आहे. अशा स्थितीत देशातील दूध उत्पादकांवर काय परिणाम होणार? त्याला उत्तर देताना मेहता म्हणाले की, भारतातील १० कोटींहून अधिक कुटुंबांसाठी दूध हे उपजीविकेचे साधन आहे. यातील बहुतांश उत्पादक हे अल्प आणि अल्पभूधारक शेतकरी आहेत. सरकारही हा मुख्य मुद्दा मानते. त्यामुळे डेअरी क्षेत्राला सर्व एफटीएमधून बाहेर ठेवण्यात आले आहे.