7th Pay Commission: मोदी सरकारने दिवाळीपूर्वी सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना आनंदाची बातमी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. महागाई भत्त्यात ४ टक्के वाढ करून ती ४२ टक्क्यांवरून ४६ टक्के करण्यात आली आहे.
महागाई भत्ता वाढवण्यास मंजुरी दिली
बुधवारी १८ ऑक्टोबर २०२३ रोजी मंत्रिमंडळाची बैठक झाली, ज्यामध्ये महागाई भत्त्यात वाढ करण्यास मंजुरी देण्यात आली. केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना ऑक्टोबर महिन्याचा पगार महागाई भत्त्यात वाढीसह मिळण्याची शक्यता आहे. केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना जुलै ते सप्टेंबरची थकबाकी ऑक्टोबर महिन्याच्या पगारासह दिली जाऊ शकते.
दिवाळीपूर्वीच नवरात्रीला मोदी सरकारचं गिफ्ट
१५ ऑक्टोबरपासून नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे. २४ ऑक्टोबरला दसरा आहे. १२ नोव्हेंबर २०२३ रोजी दिवाळी आहे. अशा परिस्थितीत सणासुदीच्या काळात मोदी सरकारने केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयाचा फायदा ४७ लाख कर्मचारी आणि ६८ लाख पेन्शनधारकांना होणार आहे.
महागाईपासून दिलासा मिळणार
महागाई भत्त्यात वाढ झाल्याने केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना महागाईपासून मोठा दिलासा मिळणार आहे. अलीकडच्या काळात अन्नधान्य महागाईत मोठी वाढ झाली आहे. किरकोळ महागाईचा दर सप्टेंबरमध्ये ५.०२ टक्क्यांवर आला आहे, जो ऑगस्टमध्ये ६.८३ टक्के होता. यापूर्वी जुलै २०२३ मध्ये किरकोळ महागाई दर ७.४४ टक्क्यांवर पोहोचला होता. अन्नधान्य महागाईचा दर सप्टेंबरमध्ये ६.५६ टक्क्यांवर आला, जो ऑगस्टमध्ये ९.९४ टक्के होता. मात्र गहू, तांदूळ, अरहर डाळ आणि साखरेच्या दराने सर्वसामान्यांना हैराण केले असून, त्यामुळे स्वयंपाकघराचे बजेट कोलमडले आहे. अशा परिस्थितीत महागाई भत्त्यात वाढ झाल्यामुळे दिलासा मिळणे अपेक्षित आहे.