पीटीआय, नवी दिल्ली

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सलग तीन महिने सकारात्मक पातळीवर राहिल्यानंतर, भारताची वस्तू निर्यात जुलैमध्ये १.२ टक्क्यांनी घसरून ३३.९८ अब्ज डॉलरवर सीमित राहिली. या महिन्यांत आयातीत वाढ झाल्याने, व्यापार तूट २३.५ अब्ज डॉलर्सपर्यंत विस्तारल्याचे बुधवारी वाणिज्य मंत्रालयाच्या आकडेवारीने स्पष्ट केले. आधीच्या महिन्यांत, जूनमध्ये व्यापारी मालाची निर्यात २.५६ टक्क्यांनी वाढून, ती ३५.२ अब्ज डॉलर पातळीवर होती.

वाणिज्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार, खनिज तेल, चांदी आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंची आवक वाढल्यामुळे जुलैमध्ये आयात सुमारे ७.४५ टक्क्यांनी वाढून ५७.४८ अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. यामुळे सरलेल्या जुलै महिन्यात निर्यात आणि आयात या दोहोतील तफावत म्हणजे व्यापार तूट वाढली आहे. खनिज तेलाची आयात तब्बल १७.४४ टक्क्यांनी वाढून १३.८७ अब्ज डॉलरवर पोहोचली, तर चांदीची आयात तब्बल ४३९ टक्क्यांनी वाढून १६.५७ कोटी डॉलरवर पोहोचली. सकारात्मक बाब म्हणजे जुलैमध्ये सोन्याची आयात १०.६५ टक्क्यांनी घसरली आणि ती ३.१३ अब्ज डॉलर इतकी राहिली आहे.

हेही वाचा >>>Gold-Silver Price: घसरणीनंतर सोन्याचे दर कडाडले, पाहा मुंबई-पुण्यातील १० ग्रॅम सोन्याची किंमत

या आधीच्या महिन्यांत, जूनमध्ये व्यापार तूट २१ अब्ज डॉलर होती आणि गेल्या वर्षी अर्थात जुलै २०२३ मध्ये ती १९.५ अब्ज डॉलर नोंदवली गेली होती. व्यापारी मालाच्या निर्यातीत घटीला मुख्यतः पेट्रोलियम उत्पादनांतील घट कारणीभूत ठरली आहे, जी २२.१५ टक्क्यांनी घसरून ५.२२ अब्ज डॉलरवर आली आहे. किमतीतील घसरण, कमी मागणी आणि वाढता देशांतर्गत वापर यामुळे जुलैमध्ये पेट्रोलियम उत्पादनांच्या निर्यातीत मोठी घट झाली आहे.

निर्यातीच्या बाजूने जुलैमध्ये इलेक्ट्रॉनिक वस्तू, औषध निर्माण (फार्मा) आणि अभियांत्रिकी निर्यात अनुक्रमे ३७.३१ टक्के, ८.३६ टक्के आणि ३.६६ टक्क्यांनी वधारली आहे. तर नकारात्मक वाढ नोंदवलेल्या इतर निर्यात क्षेत्रांमध्ये तांदूळ, काजू, तेलबिया, सागरी उत्पादने, रत्ने आणि दागिने, रसायने आणि सूती धागे/फॅब्रिक्स यांचा समावेश आहे.

हेही वाचा >>>दमदार बाजार पदार्पणाचे नवउद्यमींमध्ये नव्याने पर्व; ओला इलेक्ट्रिक, फर्स्टक्राय, युनिकॉमर्सची सूचिबद्धता फलदायी

विद्यमान आर्थिक वर्षातील एप्रिल-जुलै या चार महिन्यांच्या कालावधीत निर्यात ४.१५ टक्क्यांनी वाढून १४.१२ अब्ज डॉलरवर पोहोचली आहे आणि आयात ७.५७ टक्क्यांनी वाढून २२९.७ अब्ज झाली. एप्रिल-जुलै २०२३ च्या ७५.१५ अब्ज डॉलरच्या तुलनेत या आर्थिक वर्षाच्या पहिल्या चार महिन्यांत व्यापारी व्यापार तूट ८५.५८ अब्ज डॉलर नोंदवली गेली आहे. एप्रिल-जुलै २०२४ या कालावधीत सेवा निर्यातीचे अंदाजे मूल्य ११७.३५ अब्ज होते, जे गेल्यावर्षी म्हणजेच एप्रिल-जुलै २०२३ मध्ये १०६.७९ अब्ज डॉलर होते.

‘निर्यातवाढीचे लक्ष्य गाठणार’

देशाची एकूण वस्तू आणि सेवांची निर्यात गेल्या वर्षीच्या ७७८ अब्ज डॉलरचा आकडा पार करेल, असा विश्वास वाणिज्य सचिव सुनील बर्थवाल यांनी व्यक्त केला. सध्या अमेरिका, युरोप आणि चीनद्वारे सेवा दिल्या जात असलेल्या आफ्रिकेसारख्या देशांमध्ये निर्यातवाढीसाठी वाणिज्य मंत्रालय उपाययोजना करत आहे. यासाठी ई-कॉमर्स बाजारमंचांवरही लक्ष केंद्रित केले जात असून त्यादृष्टीने अनेक योजना आणल्या जात आहे. अर्थसंकल्पात ‘ई-कॉमर्स हब’ उभारण्याची घोषणा हे त्यादिशेने टाकलेले एक पाऊल आहे, असे बर्थवाल म्हणाले.

आंतरराष्ट्रीय व्यापार संकटात

मालवाहतुकीचे उच्च दर, वस्तूंच्या किमतीत झालेली घसरण आणि जहाजे आणि कंटेनरची अपुरी उपलब्धता यासारख्या समस्या निर्यातीवर परिणाम करत आहेत. मात्र पुढील महिन्यापासून परिस्थिती सुधारू शकते. बांगलादेशातील परिस्थिती सुधारत असून भारतीय व्यवसायांनी अद्याप त्यांचे कारखाने सुरू केलेले नाहीत. सध्या सुरू असलेले रशिया-युक्रेन युद्ध, लाल समुद्रातील संकट आणि इस्रायल-हमास संघर्ष यासह विविध भू-राजकीय तणावांसह, भारतीय निर्यातदारांसाठी आंतरराष्ट्रीय व्यापार कठीण बनला आहे, असे मत फेडरेशन ऑफ इंडियन एक्सपोर्ट ऑर्गनायझेशन्सचे अध्यक्ष अश्वनी कुमार यांनी व्यक्त केले.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Goods exports down 1 2 percent in july print eco news amy