देशाची वस्तू व्यापार तूट मे महिन्यात २२.१ अब्ज डॉलर या उच्चांकी पातळीवर पोहोचली आहे. एप्रिल महिन्यात ही तूट १५.२ अब्ज डॉलर होती. याचवेळी एकूण व्यापारी तूट मे महिन्यात १०.३५ अब्ज डॉलर आहे, अशी माहिती वाणिज्य मंत्रालयाने दिली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत मे महिन्यात वस्तूंची निर्यात १०.२ टक्के घट होऊन ३५ अब्ज डॉलर झाली आहे. याचवेळी वस्तूंच्या आयातीतही मे महिन्यात ६.५ टक्के घट नोंदवण्यात आली आहे. ती ५७.१ अब्ज डॉलर आहे. एप्रिलमध्ये वस्तू निर्यात ३४.६ अब्ज डॉलर होती. मे महिन्यात त्यात फारशी वाढ झालेली नाही. एप्रिलमध्ये वस्तू आयात ४९.९ अब्ज डॉलर होती. त्यात मे महिन्यात १४ टक्के वाढ नोंदवण्यात आली, असे वाणिज्य मंत्रालयाने म्हटले आहे.
मे महिन्यात सेवा क्षेत्राची निर्यात २५.३० अब्ज डॉलर झाली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत त्यात वाढ झालेली नाही. सेवा क्षेत्राची आयात मागील वर्षीच्या तुलनेत मे महिन्यात ११ टक्क्याने कमी झाली आहे. ही आयात १३.५३ अब्ज डॉलर आहे. वस्तू व सेवांची एकूण निर्यात मे महिन्यात ६०.२९ अब्ज डॉलर असून, आयात ७०.६४ अब्ज डॉलर आहे, असे वाणिज्य मंत्रालयाने सांगितले आहे.
हेही वाचाः गुंतवणूकदारांचा उत्साह वाढला; ‘बीएसई’चे एकत्रित बाजार भांडवल विक्रमी २९२ लाख कोटींपुढे
जागतिक मंदीचा निर्यातीवर परिणाम
वाणिज्य मंत्रालयाचे सचिव सुनील बरथवाल म्हणाले की, जागतिक पातळीवरील मंदीमुळे निर्यातीत घट होत आहे. चालू वर्षात पहिल्या तिमाहीत यामुळे निर्यातीत मोठी घट झाली आहे. जागतिक घसरणीमुळे आपल्या व्यापारावर परिणाम होत आहे. सरकारकडून मेक इन इंडिया आणि मेक फॉर द वर्ल्ड या योजनांवर निर्यातवाढीसाठी भर दिला जात आहे. केवळ देशांतर्गत मागणी पूर्ण करण्यासाठी नव्हे तर निर्यात डोळ्यासमोर ठेवून वस्तूंचे उत्पादन करण्यावर लक्ष केंद्रित करण्यात येत आहे. वाणिज्य मंत्रालयाकडून गुंतवणूक आणि व्यापारासाठी आंतरराष्ट्रीय भागीदारीच्या संधी शोधल्या जात आहे. सुरुवातीच्या टप्प्यात आम्ही ११ देश आणि ८ वस्तू गटांसोबत यासाठी भागीदारी करणार आहोत, असंही केंद्रीय वाणिज्य सचिव सुनील बरथवाल म्हणाले आहेत.
हेही वाचाः ‘सॅट’कडून सुभाष चंद्रा, पुनित गोएंका यांना तूर्तास दिलासा नाहीच