लॉकडाऊननंतर अनेक कंपन्यांमध्ये कर्मचारी कपात होत असताना आता गुगलनेही २०० कर्मचाऱ्यांना नारळ दिला आहे. धक्कादायक म्हणजे गुगलने कोअर टीममधील कर्मचारी कपात केले आहेत. CNBC ने यासंदर्भातील वृत्त दिलं असून भारत आणि मेक्सिकोमध्ये गुगल आपला व्यवसाय वाढवण्याच्या प्रयत्नात आहे. या दोन देशात नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
Google ने वार्षिक विकासक परिषदेच्या काही आठवड्यांपूर्वी त्याच्या Flutter, Dart आणि Python टीममधून कर्मचाऱ्यांना काढून टाकले होते. त्यानंतर दोनच दिवसांनी त्यांनी कोअर टीममधून कर्मचाऱ्यांना काढून टाकले. काढून टाकण्यात आलेल्या पदांपैकी किमान ५० पदे सनीवेल, कॅलिफोर्निया येथील कंपनीच्या कार्यालयात अभियांत्रिकी क्षेत्रातील आहेत.
गुगल डेव्हलपर इकोसिस्टमचे उपाध्यक्ष असीम हुसेन यांनी या टाळेबंदीची घोषणा केली होती. त्यांनी गेल्या आठवड्यात त्यांच्या कर्मचाऱ्यांना ईमेल पाठवला होता. ते एका टाऊन हॉलमध्ये देखील बोलले की या वर्षातील त्यांच्या टीमसाठी ही सर्वात मोठी नियोजित कपात होती.
कोअर टीममध्ये उत्पादनांचा तांत्रिक पाया तयार करणारी कर्मचारी असतात, असं गुगलच्या वेबसाईटवर नमूद आहे. Google मधील कोअर टीम ही डिझाइन घटक, Developer Platform, उत्पादन घटक आणि पायाभूत सुविधांसाठी जबाबदार आहे.
टेस्लातही झाली होती कर्मचारी कपात
नफा आणि मागणी घटत असल्याच्या कारणाने एप्रिल महिन्यात टेस्लाने टेक्सास आणि कॅलिफोर्नियामधील सहा हजार कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले होते. विक्रीतील घट आणि इलेक्ट्रिक वाहनांच्या बाजारपेठेत वाढलेली स्पर्धा यामुळे कंपनी तोट्यात आहे. EV उत्पादक कंपनी टेस्लाने २०२० नंतर प्रथमच कंपनीच्या तिमाही नफ्यात घट पाहिली.