वृत्तसंस्था, नवी दिल्ली
आघाडीचे म्युच्युअल फंड घराणे कॅनरा रोबेको ॲसेट मॅनेजमेंट कंपनीच्या प्रारंभिक समभाग (आयपीओ) विक्रीला केंद्रीय अर्थमंत्रालयाच्या वित्तीय सेवा विभागाची येत्या पंधरवड्यात मंजुरी मिळणे अपेक्षित आहे, असे कॅनरा बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी के सत्यनारायण राजू यांनी सांगितले.
कॅनरा रोबेको ॲसेट मॅनेजमेंट कंपनीचा ‘आयपीओ’साठी मसुदा प्रस्तावाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. या कंपनीत कॅनरा बँकेची ५१ टक्के हिस्सेदारी आहे. यापैकी १३ टक्के हिस्सा ‘आयपीओ’च्या माध्यमातून विकण्याची बँकेची योजना आहे. कॅनरा बँकेच्या संचालक मंडळाने गेल्या डिसेंबरमध्ये कॅनरा रोबेको ॲसेट मॅनेजमेंटचा आयपीओ आणण्याची प्रक्रिया सुरू करण्यास तत्त्वतः मान्यता दिली होती. विद्यमान आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीत भागविक्री सुरू होण्याची अपेक्षा आहे. जुलै-सप्टेंबर तिमाहीत, कॅनरा रोबेको एएमसीने ८०.२८ कोटी रुपयांचा निव्वळ नफा नोंदवला आहे. या नफ्यामध्ये कॅनरा बँकेचा हिस्सा ४०.९३ कोटी रुपये आहे.
हेही वाचा : युरोपीय महासंघ-भारतादरम्यान मुक्त व्यापार करारासाठी उत्सुक, स्पेनच्या अध्यक्षांचे मुंबई दौऱ्यात प्रतिपादन
विमा कंपनीदेखील सूचिबद्धतेच्या तयारीत
पुढील आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत कॅनरा एचएसबीसी लाइफ इन्शुरन्स कंपनी या आणखी एका सहयोगी कंपनीचे समभागदेखील भांडवली बाजारात सूचिबद्ध करण्याची कॅनरा बँकेची योजना असल्याचे, बँकेचे व्यवस्थापकीय संचालक के. सत्यनारायण राजू यांनी सांगितले. या विमा कंपनीत कॅनरा बँकेचा ५१ टक्के भागभांडवली हिस्सा आहे. कॅनरा बँकेने सरलेल्या ३१ मे रोजी आयपीओच्या माध्यमातून विमा कंपनीतील १४.५ टक्के हिस्सा विक्री करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.