नवी दिल्ली : चलनवाढ आणखी कमी करण्यासाठी केंद्र सरकार उपाययोजना करेल, अशी ग्वाही अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बुधवारी लोकसभेत दिली. सलग ११ महिने सहा टक्क्यांपेक्षा अधिक राहिलेला किरकोळ महागाई दर नोव्हेंबरमध्ये ५.८८ टक्क्यांपर्यंत खाली आला, तर घाऊक महागाई दरही २१ महिन्यांच्या नीचांकावर घसरला आहे.
जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीवर सरकार लक्ष ठेवून असून सर्वसामान्यांसाठी महागाई आणखी कमी करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. देशात महागाईचा दर आटोक्यात असून, भारत ही जगातील सर्वाधिक वेगाने विस्तारणारी अर्थव्यवस्था आहे. यामुळे भारताला मंदीची भीती नाही, असेही सीतारामन म्हणाल्या. वित्तीय तुटीबाबात बोलताना, चालू आर्थिक वर्षांसाठी सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या (जीडीपी) तुलनेत वित्तीय तूट ६.४ टक्क्यांच्या मर्यादेत राखण्याचे उद्दिष्ट पूर्ण केले जाईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
केंद्र सरकारने बँकिंग क्षेत्रात केलेल्या सुधारणा आणि विविध उपाययोजनांमुळे अनुत्पादित कर्जे (एनपीए) मार्च २०२२ च्या अखेरीस ते ७.२८ टक्क्यांपर्यंत कमी झाली आहेत. डॉलरच्या तुलनेत रुपयातील घसरण मर्यादित पातळीवर आहे. तसेच डॉलरेतर इतर देशांच्या चलनांच्या तुलनेत रुपया वधारला आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये रुपयाला सावरण्यासाठी रिझव्र्ह बँकेकडून परकीय गंगाजळीतून डॉलरची विक्री करण्यात आली. तरी देशाची परकीय गंगाजळी सध्या मजबूत पातळीवर असून जागतिक अस्थिरतेचा सामना करण्यास ती समर्थ असल्याचे सीतारामन म्हणाल्या.