Excise Duty Increases : एकीकडे महागाईने उच्चांक गाठलेला असताना दुसरीकडे पेट्रोल डिझेलच्या किमतींबाबत मोठी बातमी समोर आली आहे. सरकारने पेट्रोल-डिझेलच्या किंमतीवरील उत्पादन शुल्क वाढवले आहे.

पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, केंद्र सरकारने सोमवारी पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात प्रतिलिटर २ रुपयांची वाढ करण्याची घोषणा केली. हे बदल मंगळवारपासून लागू होणार आहेत. पेट्रोलवरील उत्पादन शुल्क प्रति लिटर १३ रुपये आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क १० रुपये करण्यात आल्याचे आदेशात म्हटले आहे.

उत्पादन शुल्कात वाढ केल्याने किरकोळ किमतींवर काय परिणाम होईल, हे आदेशात सांगण्यात आलेले नाही. परंतु, पीटीआयने उद्योग सूत्रांच्या हवाल्याने सांगितले की किरकोळ किमतींमध्ये बदल होण्याची शक्यता कमी आहे. आंतरराष्ट्रीय तेलाच्या किमतीत घट झाल्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये आधीच कपात झालेली आहे. त्यामुळे उत्पादन शुल्क वाढीचा परिणाम होण्याची शक्यता कमी आहे.

अमेरिकेने आयात शुल्क लादल्याने शेअर बाजारात मोठी पडझड पाहायला मिळतेय. तसंच, इतर उत्पादनांवरीलही किमती वाढण्याची शक्यता आहे. असं असतानाच केंद्र सरकारने पेट्रोल डिझेलवरील उत्पादन शुल्क वाढवल्याने याचा परिणाम पेट्रोल डिझेलच्या किरकोळ किमतीवर झाल्यास सामान्य नागरिकांचं बजेट हलण्याची शक्यता आहे. यामुळे प्रवासासह इतर अनेक सेवा सुविधा महाग होतील.

पेट्रोल -डिझेलच्या किरकोळ किमती वाढणार नाहीत

दरम्यान, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने म्हटले आहे की, “आज उत्पादन शुल्क दरात वाढ झाल्यानंतर, पीएसयू तेल विपणन कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ किमतीत कोणतीही वाढ होणार नाही, असे कळवले आहे.” जागतिक तेलाच्या किमती घसरल्यामुळे डिसेंबर २०२४ मध्ये सरकारने स्थानिक पातळीवर उत्पादित कच्च्या तेल आणि इंधन निर्यातीवरील अनपेक्षित नफा कर काढून टाकला होता.