US President Donald Trump Truth Post : “श्रीमंत होण्याची हीच योग्य वेळ”, व्यापार कर लादल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांची पोस्ट चर्चेत!अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेक देशांवर व्यापारी कर लादल्याने अनेक कंपन्यांच्या उत्पादनांवर आणि त्यांच्या किमतीवर परिणाम झाला आहे. परिणामी अमेरिका, भारतासह अनेक देशातील शेअर बाजारात गेल्या आठवड्याभरापासून घसरण पाहायला मिळतेय. २०२० च्या लॉकडाऊन काळात अमेरिकेच्या शेअर बाजाराने जी घसरण पाहिली होती त्यासारखी घसरण शुक्रवारीही अमेरिकेत झाली. त्यामुळे अमेरिकेचा शेअर बाजार घसरणीकडे वाटचाल करत असताना राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी ट्रूथ या सोशल मीडियावर गुंतवणूकदारांना आकर्षित करणारी पोस्ट केली आहे. मी माझी धोरणे कधीही बदलणार नाही, असं म्हणत श्रींत होण्याची हीच उत्तम वेळ असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
पूर्वीपेक्षा जास्त श्रीमंत होण्याची संधी
ट्रुथ या सोशल मीडियावरील पोस्टमध्ये राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, “अमेरिकेत येणाऱ्या आणि मोठ्या प्रमाणात पैसे गुंतवणाऱ्या अनेक गुंतवणूकदारांनो, मी माझ्या धोरणांमध्ये कधीही बदल करणार नाही. श्रीमंत होण्याची, पूर्वीपेक्षा जास्त श्रीमंत होण्याची ही उत्तम वेळ आहे!”
गुरुवारी तिन्ही प्रमुख अमेरिकन निर्देशांकांनी २०२० नंतरचा सर्वात वाईट दिवस पाहिल्यानंतर, जागतिक अर्थव्यवस्था मंदीच्या खाईत ढकलण्याची भीती निर्माण झालेली असताना अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी ही पोस्ट केली आहे.
चीनमधील टेक कंपन्या दबावाखाली
शुक्रवारी, डाऊ जोन्स इंडस्ट्रियल एव्हरेज फ्युचर्समध्ये १,२०० अंकांची म्हणजेच ३ टक्क्यांची घसरण झाली. गुरुवारी १,६७९ अंकांची घसरण झाली होती. तसंच, आदल्या दिवशी निर्देशांक ४.८४ टक्क्यांनी घसरल्यानंतर एस अँड पी ५०० फ्युचर्समध्येही ३ टक्क्यांनी घसरण झाली, तर नॅस्डॅक १०० फ्युचर्समध्ये २.६ टक्क्यांनी घसरण झाली. कारण चीनमध्ये लक्षणीय एक्सपोजर असलेल्या अनेक टेक कंपन्या दबावाखाली आल्या.
चीननेही अमेरिकेवर लादला व्यापार कर
दरम्यान अमेरिकेने चीनवर व्यापार कर लादल्यानंतर चीननेही आक्रमक भूमिका घेत अमेरिकेवर आयात शुल्क लावले. त्यानुसार, चीनने आता अमेरिकेच्या सर्व उत्पादनांवर ३४ टक्के कर लादणार आहे.