पीटीआय, नवी दिल्ली
चालू आर्थिक वर्षात निव्वळ प्रत्यक्ष कर संकलन १४.६९ टक्क्यांनी वाढून १७.७८ लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे, असे सरकारी आकडेवारीने मंगळवारी स्पष्ट केले. उल्लेखनीय बाब म्हणजे देशभरात शेअर गुंतवणुकीकडे वाढता ओढा, वाढत्या उलाढालीमुळे प्रत्यक्ष करातील सर्वाधिक वाढ याच विभागातील करामुळे झाली आहे.
केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, १० फेब्रुवारी २०२५ पर्यंत प्रामुख्याने वैयक्तिक प्राप्तिकराचा समावेश असलेले बिगर-कंपनी करांमधून मिळणारे उत्पन्न, वार्षिक तुलनेत २१ टक्क्यांनी वाढून सुमारे ९.४८ लाख कोटी रुपये झाले आहे. तर १ एप्रिल २०२४ ते १० फेब्रुवारी २०२५ दरम्यान निव्वळ कंपनी कराद्वारे संकलन मात्र वार्षिक तुलनेत ६ टक्के वाढले आहे. कंपनी करापोटी महसूल ७.७८ लाख कोटी रुपयांवर पोहोचला आहे.
या आर्थिक वर्षात आतापर्यंत रोखे उलाढाल करांतून (सिक्युरिटीज ट्रान्झॅक्शन टॅक्स – एसटीटी) मिळणारे उत्पन्न ६५ टक्क्यांनी वाढून ४९,२०१ कोटी रुपयांवर पोहोचले आहे. ही या करातील आजवरची सर्वाधिक वाढ असून, ती वाढत्या शेअर बाजारातील उलाढालीचे द्योतक आहे. या १० फेब्रुवारी २०२५ पर्यंतच्या कालावधीत ४.१० लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त परतावा (रिफंड) जारी करण्यात आला, जो मागील वर्षाच्या तुलनेत ४२.६३ टक्के जास्त आहे. परतावा जमेस धरल्यास, १० फेब्रुवारीपर्यंतचा एकूण प्रत्यक्ष कर संकलन १९.०६ टक्क्यांनी वाढून २१.८८ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त झाला आहे.
चालू आर्थिक वर्षासाठी सुधारित अंदाजानुसार, प्राप्तिकराद्वारे महसूल १२.५७ लाख कोटी रुपयांवर जाण्याचा अंदाज आहे, जो अर्थसंकल्पीय अंदाज ११.८७ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. आर्थिक वर्षासाठी ‘एसटीटी’मधून ५५,००० कोटी रुपये महसूल येण्याचा अंदाज असून, जो ३७,००० कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पीय अंदाजापेक्षा जास्त आहे. कंपनी कर संकलनाचे सुधारीत लक्ष्य ९.८० लाख कोटी रुपये असून, जे १०.२० लाख कोटी रुपये अर्थसंकल्पीय अंदाजाच्या तुलनेत घटले आहे. सुधारीत अंदाजानुसार एकूण प्रत्यक्ष कर संकलन २२.३७ लाख कोटी रुपये राहण्याचे अनुमान आहे, जे अर्थसंकल्पाद्वारे अंदाजित २२.०७ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.