नवीन व्यवसायातील वाढ आणि उत्पादन मंदावल्याने सरलेल्या ऑक्टोबरमध्ये सेवा क्षेत्राची वाढ खुंटून, ती सात महिन्यांतील नीचांकी पातळीवर घसरल्याचे, शुक्रवारी प्रसिद्ध झालेल्या अहवालाने स्पष्ट केले.
भारतातील सेवा व्यवसायातील खरेदी व्यवस्थापकांचा कल दर्शविणाऱ्या ‘एस ॲण्ड पी ग्लोबल इंडिया सर्व्हिसेस पीएमआय’ निर्देशांक ऑक्टोबर महिन्यात ५८.४ गुणांवर नोंदला गेला. सप्टेंबरमध्ये तो ६१ गुणांसह १३ वर्षांतील उच्चांकी पातळीवर होता. ऑक्टोबरमध्ये मात्र, मार्चपासूनची सर्वांत कमी वाढ नोंदविण्यात आली. पीएमआय निर्देशांक ५० गुणांच्या वर राहिल्यास अर्थव्यवहारातील विस्तार दर्शविला जातो, तर ५०च्या खाली गुणांक आकुंचनाचे निदर्शक मानले जाते. त्यामुळे वाढीचा वेग मंदावला असला तरी त्यातील विस्तारपूरकता कायम आहे.
सेवा क्षेत्रातील ४०० कंपन्यांचे सर्वेक्षण करून हा निर्देशांक जाहीर करण्यात आला आहे. ऑक्टोबरमध्ये आंतरराष्ट्रीय कार्यादेशामध्ये चांगली वाढ नोंदविण्यात आली. सप्टेंबर २०१४ नंतर झालेली ही सर्वाधिक वाढ आहे. आशिया, युरोप आणि अमेरिकेतून नवीन कार्यादेशामध्ये वाढ झालेली आहे. सेवा क्षेत्राची निर्यात ऑक्टोबरमध्ये भक्कम आहे. आशिया, युरोप आणि अमेरिकेतील नवीन व्यवसायांमुळे निर्यातीने नऊ वर्षांतील उच्चांकी पातळी गाठली आहे, असे सर्वेक्षणात नमूद केले आहे.
अनेक कंपन्या नवीन कार्यादेश मिळविण्यात यशस्वी ठरल्या आहेत, परंतु सेवांची कमी झालेली मागणी आणि वाढलेली स्पर्धात्मकता हे मुद्देही अनेक कंपन्यांनी उपस्थित केले आहेत. अनेक कंपन्यांनी अतिरिक्त किमतीचा बोजा ग्राहकांवर टाकला आहे. त्यामुळेही विक्रीतील वाढ कमी झाली आहे. – पॉलियाना डी लिमा, अर्थतज्ज्ञ, एस ॲण्ड पी ग्लोबल मार्केट इंटेलिजन्स