पीटीआय, नवी दिल्ली
देशातील कारखानदारी क्षेत्राची कामगिरी आणि उद्योगांच्या उत्पादन वाढीचे प्रतिबिंब मानला जाणारा औद्योगिक उत्पादन निर्देशांक (आयआयपी) ऑगस्टमध्ये (उणे) ०.१ टक्क्यांवर आकुंचन पावला आहे. करोना संकटानंतर चार वर्षांत पहिल्यांदाच नकारात्मक पातळीवर अधोगती आणि २२ महिन्यांनंतर त्यात घसरण झाल्याचे शुक्रवारी जाहीर झालेल्या सरकारी आकडेवारीने स्पष्ट केले. खाणकाम क्षेत्रातील घसरण यासाठी प्रामुख्याने कारणीभूत ठरली आहे.

केंद्रीय सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने शुक्रवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, उद्योग क्षेत्राच्या गतिमानतेचा सूचक मानला जाणाऱ्या औद्योगिक उत्पादन निर्देशांकातील वाढ आधीच्या जुलै महिन्यात ४.७ टक्के होती. तर गेल्या वर्षी म्हणजेच ऑगस्ट २०२३ मध्ये त्यात १०.९ टक्क्यांनी विस्तार झाला होता. सुमारे चार वर्षांनंतर, करोना साथीनंतर त्यांनी नकारात्मक वळण दर्शविले आहे.

हेही वाचा : आयुर्विमा कंपन्यांच्या पहिल्या हप्त्यापोटी उत्पन्नांत १४ टक्के वाढ, ‘एलआयसी’ची हिस्सेदारी ५८ टक्क्यांवर

सरलेल्या ऑगस्ट महिन्यात खाणकाम, उत्पादन आणि वीज क्षेत्राची कामगिरी सुमार राहिली. त्यातील वाढ अनुक्रमे (-) ४.३ टक्के, ०.१ टक्के आणि (-) ३.७ टक्के अशी होती. ऑगस्ट २०२४ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे खाण क्षेत्राच्या वाढीत घट होण्याची शक्यता आहे, असे एनएसओने म्हटले आहे. आर्थिक वर्षात एप्रिल ते ऑगस्टमध्ये आयआयपी ४.२ टक्क्यांनी विस्तारला आहे, जो मागील वर्षी ६.२ टक्क्यांवर होता.

हेही वाचा : प्रत्यक्ष कर संकलन १८ टक्के वाढीसह ११.२५ लाख कोटींवर

‘आयआयपी’ म्हणजे काय?

देशात ठरावीक कालावधीत औद्योगिक उत्पादनात वाढ किंवा घट किती झाली याची मोजदाद ‘इंडेक्स ऑफ इंडस्ट्रियल प्रॉडक्शन’ म्हणजेच ‘आयआयपी’ या निर्देशांकाच्या माध्यमातून केली जाते. देशाच्या दीर्घकालीन प्रगतीचा कणा म्हणजेच द्वितीयक (सेकंडरी) क्षेत्र अर्थात कारखानदारी उद्योग! कोणत्याही कच्च्या मालावर प्रक्रिया करून पक्क्या मालात रूपांतर करणे, वस्तूचे मूल्य वाढवणे हे काम कारखानदारी उद्योगात केले जाते.