आशिया-प्रशांत क्षेत्रातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था भारताची असेल असे नमूद करीत एस ॲण्ड पी ग्लोबल रेटिंग्जने देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पादन अर्थात जीडीपी वाढीचा अंदाज सहा टक्क्यांवर कायम ठेवला असल्याचे सोमवारी स्पष्ट केले.

देशांतर्गत अर्थव्यवस्थेच्या विविध घटकांमधील आश्वासक वाढ पाहता, या जागतिक पतमानांकन संस्थेने चालू आणि पुढील आर्थिक वर्षासाठी भारताच्या जीडीपी वाढीचे अनुमान हे मार्चमध्ये केलेल्या अंदाजाप्रमाणे कायम ठेवले असल्याचे स्पष्ट केले. भारत, व्हिएतनाम आणि फिलिपिन्समध्ये सर्वात जलद सहा टक्क्यांची वाढ दिसून येईल, असे एस ॲण्ड पी ग्लोबल रेटिंग्सने आशिया-प्रशांत क्षेत्रासंबंधीच्या तिमाही आर्थिक टिपणांत म्हटले आहे. याच टिपणांत विद्यमान २०२३ सालासाठी चीनच्या अर्थव्यवस्थेच्या वाढीचा अंदाज ५.५ टक्क्यांवरून ५.२ टक्क्यांवर खाली आणला गेला आहे.

हेही वाचाः भरती प्रक्रियेत लाचखोरी झाल्याचे आरोप TCS नं फेटाळले; कंपनीनं दिलं स्पष्टीकरण

आशिया खंडातील उदयोन्मुख बाजारपेठेतील अर्थव्यवस्था २०२६ पर्यंतच्या जागतिक वाढीच्या दृष्टिकोनात सर्वात वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्था असतील. विशेषत: मध्यम-मुदतीच्या अर्थवृद्धीचा दृष्टिकोन तुलनेने मजबूत असल्याचे एस ॲण्ड पी ग्लोबल रेटिंग्सचे आशिया-प्रशांत विभागाचे मुख्य अर्थशास्त्रज्ञ लुईस कुइज म्हणाले.

हेही वाचाः २००० च्या नोटेनंतर आता ५०० रुपयांच्या नोटेबाबत मोठी माहिती; काय आहे व्हायरल दाव्यामागचं सत्य?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुढील वर्षारंभी व्याजदर कपात

भारतातील किरकोळ चलनवाढीचा दरही ६.७ टक्क्यांवरून चालू आर्थिक वर्षात पाच टक्क्यांवर येण्याची शक्यता आहे आणि रिझर्व्ह बँक पुढील वर्षीच्या सुरुवातीलाच व्याजदरात कपात करेल अशी अपेक्षा असल्याचे त्यांनी सांगितले. अर्थात पर्जन्यमान सामान्य राहील आणि खनिज तेलाच्या आंतरराष्ट्रीय किमती नरमणे हे चलनवाढीच्या पथ्यावर पडेल असे यामागे गृहीतक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.