मुंबई : रिझर्व्ह बँकेने येत्या फेब्रुवारी महिन्यात नियोजित पतधोरण समितीच्या बैठकीत व्याजदरात पाव टक्क्यांची कपात करून व्याजदर कपातीचे सत्र सुरू करणे अपेक्षित असल्याचे जर्मनीच्या डॉइशे बँकेने मंगळवारी प्रसिद्धीस टिपणांत म्हटले आहे. कपातीला विलंब केल्यास त्याचा अर्थव्यवस्थेच्या वाढीवर प्रतिकूल परिणामाची शक्यता टिपणाने व्यक्त केली आहे.

हेही वाचा >>> अडीच कोटी वाहनांची वर्षभरात विक्री; ‘सियाम’ची आकडेवारी; २०२३ च्या तुलनेत १२ टक्क्यांची वाढ

व्याजदर कपातीला विलंब केला गेल्यास विकासदर खालच्या दिशेने सरकण्याचा धोका संभवतो, असे सांगत डॉइशे बँकेच्या विश्लेषकांनी सावधगिरीचा इशारा दिला आहे. रिझर्व्ह बँक फेब्रुवारी आणि एप्रिलच्या पतधोरण बैठकीत रेपोदरात प्रत्येकी पाव (०.२५) टक्के कपात करू शकेल. ज्यामुळे २०२५ च्या पहिल्या सहामाहीत रेपो दर ६ टक्क्यांपर्यंत खाली येईल, अशी अपेक्षा टिपणाने व्यक्त केली आहे. भारतात किमान तीन वर्षे व्याजाचे दर उच्च पातळीवर आहेत. म्हणूनच, फेब्रुवारीपासून रिझर्व्ह बँकेने दर कपातीचे चक्र सुरू करणे योग्य ठरेल. जेवढ्या लवकर व्याजदर कपात होईल, तेवढी विकासदरातील घसरण रोखली जाऊ शकेल.

हेही वाचा >>> कॉसमॉस बँकेच्या अध्यक्षपदी प्रल्हाद कोकरे, उपाध्यक्षपदी यशवंत कासार

विकासदर गेल्या काही महिन्यात सात तिमाहींच्या नीचांकीवर गेला असला तरी, रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या नेतृत्वाखाली मध्यवर्ती बँकेने सलग ११ वेळा रेपो दर कायम ठेवले. आता सर्वांचे लक्ष रिझर्व्ह बँकेचे नवीन गव्हर्नर संजय मल्होत्रा यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या पहिल्या पतधोरणाच्या बैठकीकडे लागले आहे. दरवाढीच्या चक्राच्या समाप्तीपासून ते दर कपातीच्या चक्राच्या सुरुवातीपर्यंत रिझर्व्ह बँकेने मोठा विराम घेतला आहे. म्हणजेच व्याजदराबाबत यथास्थिती कायम ठेवली आहे. रिझर्व्ह बँकेला अर्ध्या टक्क्यांपर्यंत व्याजदर कपातीस वाव आहे. अमेरिकी मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हने याआधीच व्याजदर कपात सुरू केली आहे.

Story img Loader