पीटीआय, नवी दिल्ली
वस्तू आणि सेवा करापोटी (जीएसटी) फेब्रुवारी २०२३ मधील संकलन वार्षिक तुलनेत १२ टक्क्यांनी वाढून १.४९ लाख कोटींवर पोहोचले आहे, असे अर्थमंत्रालयाने बुधवारी सांगितले. तर जीएसटीची अंमलबजावणी सुरू झाल्यापासून सरलेल्या महिन्यांत उपकराच्या माध्यमातून सर्वाधिक ११,९३१ कोटी रुपयांचा महसूल जमा झाला आहे.
जानेवारी २०२३ मध्ये जीएसटीच्या माध्यमातून १.५६ लाख कोटींचा महसूल सरकारी तिजोरीत जमा झाला होता, त्या तुलनेत सरलेल्या फेब्रुवारी महिन्यात संकलन घटले असले तरी गेल्या वर्षी याच महिन्यात (फेब्रुवारी २०२२) झालेल्या १.३३ लाख कोटी रुपयांच्या कर संकलनाच्या तुलनेत ते १२ टक्क्यांनी वाढले आहे. विद्यमान आर्थिक वर्षात एप्रिल २०२२ मध्ये जीएसटी संकलनाने १.६८ लाख कोटी रुपयांचा ऐतिहासिक उच्चांक नोंदवला होता. फेब्रुवारी महिना २८ दिवसांचा असल्याने तुलनेने कमी संकलन झाले, असे अर्थमंत्रालयाने म्हटले आहे.
हेही वाचा – मूडीजचा ५.५ टक्के विकासदराचा अंदाज
सरलेल्या फेब्रुवारी २०२३ मध्ये गोळा झालेला एकत्रित जीएसटी महसूल १,४९,५७७ कोटी रुपये आहे. यंदाच्या एकत्रित कर महसुलात, केंद्रीय वस्तू व सेवा करापोटी (सीजीएसटी) २७,६६२ कोटी रुपये, राज्य वस्तू व सेवा करापोटी (एसजीएसटी) ३४,९१५ कोटी रुपये, तर एकात्मिक वस्तू व सेवाकरापोटी ७५,०६९ कोटी रुपये (आयात वस्तूंवर गोळा केलेल्या ३५,६८९ कोटी रुपयांसह) आणि ११,९३१ कोटी रुपये उपकरातून (माल आयातीवर जमा झालेल्या ७९२ कोटी रुपये उपकरासह) गोळा झाले आहेत, असे अर्थ मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
हेही वाचा – निर्मिती क्षेत्रातील सक्रियता कायम
विद्यमान वर्षात जीएसटीतून १६.४६ लाख कोटी
विद्यमान आर्थिक वर्षात ११ महिन्यांत जीएसटीच्या माध्यमातून सुमारे १६.४६ लाख कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे. एप्रिलमध्ये १.६८ लाख कोटींचे विक्रमी संकलन झाले, त्यानंतर मेमध्ये १.४१ लाख कोटी, जून १.४५ लाख कोटी, जुलै १.४९ लाख कोटी, ऑगस्ट १.४४ लाख कोटी, सप्टेंबर १.४८ लाख कोटी, ऑक्टोबर १.५२ लाख कोटी, नोव्हेंबर १.४६ लाख कोटी आणि डिसेंबर २०२२ मध्ये १.४९ लाख कोटी, तर जानेवारी २०२३ मध्ये १.५६ लाख कोटी रुपयांचे संकलन झाले आहे. चालू आर्थिक वर्षात सलग अकराव्या महिन्यात जीएसटी संकलन १.४० लाख कोटींहून अधिक राहिले आहे.