नवी दिल्ली, मुंबई : नोव्हेंबर महिन्यात देशात १.४५ लाख कोटी रुपयांचा वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) जमा झाला आहे. केंद्रीय अर्थमंत्रालयाने गुरूवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार ऑक्टोबर महिन्यापेक्षा कर संकलन ३.९ टक्क्यांनी घटले असून महाराष्ट्रातील कर संकलन सहा टक्क्यांनी (सुमारे दीड हजार कोटी) कमी झाले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ऑक्टोबर महिन्यात सणासुदीचे दिवस असल्यामुळे जीएसटी संकलन तब्बल १.५२ लाख कोटींच्या घरात गेले होते. त्या तुलनेत नोव्हेंबरमध्ये महिन्यात १,४५,८६७ कोटींचे महसुली उत्पन्न मिळाले असताना नोव्हेंबर २०२१च्या तुलनेत मात्र १०.९ टक्क्यांची वाढ झाली आहे. नोव्हेंबर २०२१मध्ये १.३२ लाख कोटी कर संकलित झाला होता. चालू वर्षांत मार्च महिन्यापासून जीएसटी संकलन हे निरंतर १.४० लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक राहिले आहे. नोव्हेंबरमधील जीएसटी महसुलामध्ये केंद्रीय जीएसटीपोटी रक्कम २५,६८१ कोटी रुपये, राज्य जीएसटी म्हणून ३२,६५१ कोटी रुपये आणि एकात्मिक जीएसटीपोटी ७७,१०३ कोटी रुपये (आयात वस्तूंवर मिळालेल्या ३८,६३५ कोटी रुपयांसह) आले आहेत, तर उपकर संकलनाची रक्कम १०,४३३ कोटी (आयातीवर मिळालेल्या ८१७ कोटी रुपयांसह) रुपयांचा वाटा असल्याचे अर्थ मंत्रालयाने दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे.

दुसरीकडे महाराष्ट्रात ऑक्टोबरमध्ये २३ हजार कोटींपेक्षा अधिक कर जमा झाला होता. नोव्हेंबमध्ये त्यात सुमारे दीड हजार कोटींची घट होऊन २१,६११ कोटींचे कर संकलन झाले आहे. ऑक्टोबरमध्ये सणांमुळे संकलन वाढले होते, मात्र राज्याची सरासरी ही २१ हजार कोटींच्या आसपास असल्याचे वित्त विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. देशात संकलनात महाराष्ट्र सर्वाधिक आघाडीवरील राज्य आहे. दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या कर्नाटकपेक्षा (१०,२३८ कोटी) महाराष्ट्राचे संकलन दुप्पट असल्याकडे अधिकाऱ्यांनी लक्ष वेधले. देशांतर्गत आर्थिक विकास दर कमी झाल्याचे परिणाम राज्यातही उमटल्याचा अंदाज त्यांनी वर्तविला.

आठ महिन्यांत ११.८८ लाख कोटी

चालू आर्थिक वर्षांत दोनदा एकूण संकलन दीड लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक राहिले आहे. एप्रिल २०२२ मध्ये एकूण १.६७ लाख कोटी रुपयांचे तर ऑक्टोबरमध्ये १.५२ लाख कोटी रुपयांचे जीएसटी संकलन झाले. चालू २०२२-२३ या आर्थिक वर्षांच्या एप्रिल ते नोव्हेंबर या आठ महिन्यांत केंद्र सरकारला जीएसटीच्या माध्यमातून ११.८८ लाख कोटींचा महसूल प्राप्त झाला आहे.

महाराष्ट्रात ६ टक्के घट

महाराष्ट्रात नोव्हेंबर महिन्यात २१,६११ कोटींचे कर संकलन झाले आहे. गेल्या महिन्यात राज्यात जीएसटीमधून २३ हजार कोटींपेक्षा अधिक महसूल जमा झाला होता. त्या तुलनेत सुमारे दीड हजार कोटी, म्हणजे सहा टक्क्यांची घट नोंदविली गेली आहे.

राज्यातील      संकलन

एप्रिल         २७,४९५ कोटी

मे           २०,३१३ कोटी

जून          २२,३४१ कोटी

जुलै          २२,१२९ कोटी

ऑगस्ट       १८,८६३ कोटी

सप्टेंबर       २१,४०३ कोटी

ऑक्टोबर       २३,०३७ कोटी

नोव्हेंबर       २१,६११ कोटी

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gst collection over 1 45 lakh crore rupees in november 2022 zws