नवी दिल्ली : भारताची कृषी निर्यात ही केवळ तांदूळ आणि साखरेसह पाच उत्पादनांवर अवलंबून आहे, यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर किंमत आणि मागणीतील चढ-उताराचा मोठा फटका बसून हे क्षेत्र अस्थिर बनत असल्याचे ‘ग्लोबल ट्रेड रिसर्च इनिशिएटिव्ह’च्या (जीटीआरआय) सोमवारी प्रसिद्ध झालेल्या अहवालातून समोर आले.

जीटीआरआयने कृषी निर्यातीबाबत प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, भारताची कृषी निर्यात प्रामुख्याने बासमती तांदूळ, बिगरबासमती तांदूळ, साखर, मसाले आणि पेंड या पाच उत्पादनांवर अवलंबून आहे. देशाच्या एकूण निर्यातीत त्यांचा वाटा तब्बल ५१.५ टक्के आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर किंमत आणि मागणीत चढ-उतार झाल्याचा फटका या उत्पादनांना बसत आहे. यामुळे भारताकडून सातत्याने या उत्पादनांच्या निर्यातीवर बंदी घातली जात आहे. सध्या बिगरबासमती तांदळावर निर्यात बंदी असून, सार्वजनिक धान्य वितरण कार्यक्रमातून दिल्या जाणाऱ्या तांदूळ आणि गव्हावरील अंशदानासाठी भारत जागतिक व्यापार संघटनेंतर्गत लढा देत आहे.

हेही वाचा >>> ‘भारताची कृषी निर्यात असुरक्षित’; ‘जीटीआरआय’ अहवालाचे प्रतिपादन, तांदूळ-साखरेसह पाच उत्पादनांवर मदार धोक्याचा 

जागतिक व्यापार संघटनेतील काही सदस्य देशांनी भारताकडून साखर उत्पादक शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या अंशदानाचा मुद्दा उपस्थित केला आहे. याचबरोबर पायाभूत सुविधांचा अभाव, गुणवत्ता नियंत्रणासारख्या देशांतर्गत समस्यांचाही फटका कृषी क्षेत्राला बसत आहे. या सर्व गोष्टींमुळे भारताची कृषी निर्यात असुरक्षित आणि अनिश्चित होत आहे. यातून मार्ग काढण्यासाठी भारताने आधुनिक पायाभूत सुविधा क्षेत्रावर लक्ष द्यायला हवे, असे अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.

निर्यातीत घसरण

भारताच्या कृषी व्यापार क्षेत्रासमोर सध्या अनेक आव्हाने निर्माण झाली आहेत. देशाची कृषी निर्यात चालू वर्षात ४३.३ अब्ज डॉलरवर पोहोचण्याचा अंदाज आहे. याचवेळी आयात ३३ अब्ज डॉलरवर जाण्याचा अंदाज आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा निर्यातीत ७.२ टक्के आणि आयातीत १०.१ टक्के घट होईल, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

Story img Loader