लोकसत्ता व्यापार प्रतिनिधी

मुंबई : भांडवली बाजार नियामक ‘सेबी’ने अनोंदणीकृत वित्तीय प्रभावकांच्या (फिनफ्लुएन्सर) समाजमाध्यमांवरील ७०,००० अधिक दिशाभूल करणारा आशय काढून टाकला आहे, अशी माहिती सेबीचे पूर्णवेळ सदस्य अनंत नारायण जी यांनी शुक्रवारी दिली. गेल्यावर्षी वित्तीय प्रभावकांसाठी तयार करण्यात नियमन आराखड्यानुसार ही कारवाई केली गेली.

नोंदणी नसलेले प्रभावक म्हणजेच स्वयंघोषित गुंतवणूक सल्लागार आणि संशोधन विश्लेषक यांचे ऐकणे हे भांडवली बाजार गुंतवणूकदारांसाठी धोक्याचेच असल्याचे नारायण म्हणाले. ही मंडळी नव्याने बाजारात प्रवेश केलेल्या आणि भांडवली बाजारातील गुंतवणुकीविषयी त्यांच्या वाढत्या स्वारस्याचा गैरफायदा घेत आहेत. ऑक्टोबर २०२४ पासून, सेबीने अशा ७०,००० हून अधिक दिशाभूल करणाऱ्या विविध समाजमाध्यमांवरील आशय (पोस्ट, हँडल्स) हटविली आहेत. विविध समाजमाध्यम मंचांशी चर्चा करून ही कारवाई केली गेली.

परदेशी निधीची आवश्यकता

परदेशी गुंतवणूकदारांकडून समभाग विक्रीचा सुरू असलेल्या माऱ्याबद्दल नारायण यांनी चिंता व्यक्त केली. मात्र परदेशी गुंतवणूकदारांकडून होणारे निधीचे निर्गमन खूप मोठ्या प्रमाणावर किंवा बाजारासाठी धोकादायक नसल्याचे ते म्हणाले. परिस्थिती फार प्रतिकूल नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. देशांतर्गत प्रवाहात, विशेषतः म्युच्युअल फंडांमधून होणाऱ्या गुंतवणुकीचे प्रमाण वाढते आहे, असेही त्यांनी सांगितले.

फेब्रुवारी २०२५ अखेरपर्यंत, परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी समभागांमध्ये ६२ लाख कोटी रुपये, तर रोख्यांमध्ये ५.९ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. गेल्या पाच वर्षांत समभाग आणि रोखे यांच्यात ५४ अब्ज डॉलरचा परकीय निधीचा प्रवाह आला आहे. परदेशी गुतंवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी अर्थव्यवस्थेची शाश्वत वाढ राखण्याची जबाबदारी आपली असल्याचे नारायण म्हणाले.

Story img Loader