पीटीआय, नवी दिल्ली

देशातील आघाडीची खाद्यपदार्थ कंपनी हल्दीरामच्या नागपूर आणि दिल्ली शाखांच्या विलीनीकरणातून, ‘हल्दीराम स्नॅक्स फूड प्रायव्हेट लिमिटेड’ या एकत्रित कंपनीच्या स्थापनेची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी कृष्ण कुमार चुटानी यांनी मंगळवारी दिली.

हल्दीराम स्नॅक्स प्रायव्हेट लिमिटेड (दिल्ली) आणि हल्दीराम फूड इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड (नागपूर) यांच्या व्यवसायांचे २०२२ मध्ये केलेल्या घोषणेनुरूप एकत्र करून, त्यातून बनलेल्या संयुक्त कंपनीचे हल्दीराम स्नॅक्स फूड प्रायव्हेट लिमिटेड (एचएसएफपीएल) असे नामकरण करण्यात आले आहे. अग्रवाल कुटुंबातील दोन गट या दोन शाखा यापूर्वी स्वतंत्रपणे चालवित होत्या. त्यांचे झालेले हे फक्त विलीनीकरण नसून एक नवीन सुरुवात आहे. वारसा, आवड आणि भविष्यासाठी सामायिक दृष्टिकोन त्यातून दर्शविला जाईल, असे चुटानी म्हणाले.

या विलीनीकरणासाठी २०२३ मध्येच भारतीय स्पर्धा आयोगाची (सीसीआय) आणि राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरणाच्या (एनसीएलटी) संबंधित खंडपीठांकडून नियामक मंजुरी मिळविण्यात आली आहे. नव्याने उदयास आलेल्या एचएसएफपीएलमध्ये, दिल्ली गटाचा ५६ टक्के हिस्सा आहे आणि उर्वरित ४४ टक्के हिस्सा नागपूर शाखेकडे असेल.

भारतातील सर्वात मोठ्या पाकिटबंद खाद्यान्न कंपनीमध्ये सिंगापूरमध्ये मुख्यालय असलेली जागतिक गुंतवणूक संस्था टेमासेक, अल्फा वेव्ह ग्लोबल आणि इंटरनॅशनल होल्डिंग कंपनी (आयएचसी) या तीन धोरणात्मक गुंतवणूकदारांनी भागीदारी मिळविली आहे. त्यानंतर हे व्यावसायिक एकत्रीकरण पार पडले आहे. या घडामोडींकडे कंंपनीच्या प्रारंभिक समभाग विक्रीची (आयपीओ) प्रक्रियेची पूर्वतयारी म्हणून पाहिले जात आहे.

विलीनीकरण कराराचा तपशील उघड करण्यात आलेला नाही. मात्र हा करार टेमासेकने गुंतवणूक करताना निर्धारीत १० अब्ज अमेरिकी डॉलरच्या (सुमारे ८५,००० कोटी रुपये) मूल्यांकनानुसारच झाला असण्याची शक्यता आहे. हे पाहता भारतीय खाद्यपदार्थ उद्योगातील सर्वात मोठा करार मानला जात आहे. या करारामुळे हल्दीरामला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत, विशेषतः मोठ्या संख्येने भारतीयांचे वास्तव्य असलेल्या अमेरिका आणि आखातात व्यवसाय वाढविता येणार आहे.

राजस्थानमधील बिकानेर येथे गंगा भीषण अग्रवाल यांनी १९३७ मध्ये मिष्ठान्न आणि नमकीन यांच्या किरकोळ विक्रीचे दुकान सुरू केले, ज्यांचे रूपांतर आता ८० हून अधिक देशांमध्ये विकल्या जाणाऱ्या हल्दीराम नाममुद्रेच्या उत्पादनांत झाले आहे.