नवी दिल्ली : खाद्यपदार्थांची विक्री करणाऱ्या हल्दीरामने भांडवली बाजारात सूचिबद्ध असलेली आणि तिची प्रतिस्पर्धी कंपनी प्रताप स्नॅक्समधील बहुसंख्य भागभांडवल विकत घेण्याची शक्यता आहे. बटाटा चिप्सच्या बाजारात उपस्थिती वाढवण्यासाठी प्रयत्नशील हल्दीरामची या दिशेने पावले पडली आहेत.
हल्दीरामकडून संभाव्य अधिग्रहणाच्या वृत्तानंतर प्रताप स्नॅक्सचे समभाग गुरुवारी भांडवली बाजारात गुरुवारी एका सत्रात १३ टक्क्यांची झेप घेत १,४५० रुपये या ५२ आठवड्यातील उच्चांकी पातळीवर पोहचले. वर्ष २०१८ नंतरची समभागाची ही सर्वोच्च पातळी आहे. दिवसअखेर समभाग ९.६८ टक्क्यांनी वधारून १,३६३.५० रुपयांवर स्थिरावला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> २०२४ वर्षात गुगलसाठी वाईट बातमी, सीईओ सुंदर पिचाई असं का म्हणाले?

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या प्रताप स्नॅक्समधील हिस्सेदारी खरेदी करण्यासंदर्भात बोलणी प्राथमिक टप्प्यावर आहे. अद्याप मूल्यांकनाबाबत चर्चा झालेली नाही. हल्दीरामचा किमान ५१ टक्के अशी हिस्सेदारी खरेदी करण्याचा विचार आहे, मात्र याबाबत अद्याप निश्चित निर्णय झालेला नाही. प्रताप स्नॅक्स त्याच्या ‘यलो डायमंड’ नाममुद्रेच्या चिप्ससाठी ओळखला जातो आणि पेप्सीच्या लेज या नाममुद्रेशी तो स्पर्धा करतो. पीक एक्सव्ही पार्टनर्स, म्हणजेच पूर्वीची सेक्वोया कॅपिटल इंडियाची प्रताप स्नॅक्समध्ये सुमारे ४७ टक्के हिस्सेदारी आहे. तिच्याकडून आता प्रतापमधील संपूर्ण हिस्सेदारी विकण्याबाबत विचार सुरू आहे, असे सूत्रांनी सांगितले.
या घडामोडींबाबत हल्दीरामचे मुख्य कार्यकारी अधिकारी कृष्ण कुमार चुटानी, प्रतापचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमित कुमात आणि पीक एक्सव्ही यापैकी कोणीही भाष्य करण्यास नकार दिला.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Haldiram s seeks to buy major stake of prataap snacks print eco news zws