मुंबई: कोट्यवधींचा अपहार झाल्याचे आढळल्याने निर्बंध आलेल्या न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेच्या ठेवीदारांसाठी अटी शिथिल करणारा दिलासा देताना, रिझर्व्ह बँकेने येत्या गुरुवार, २७ फेब्रुवारीपासून प्रत्येक ठेवीदाराला त्याच्या खात्यातून २५,००० रुपयांपर्यंत पैसे काढण्याची परवानगी देण्याचा निर्णय सोमवारी घेतला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

 मुंबईस्थित या सहकारी बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करून, रिझर्व्ह बँकेने १३ फेब्रुवारी रोजी तिच्यावर लादलेल्या निर्बंधांमुळे खातेदारांना त्यांच्या ठेवी काढण्यावर बंदी आहे. बँकेतील घोटाळ्याशी संबंधित मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे विभागाकडून तपास सुरू असून, अद्यापपर्यंत तीन जणांना अटक करण्यात आली आहे. बँकेचे माजी अध्यक्ष हिरेन भानू आणि त्यांच्या पत्नी व बँकेच्या माजी उपाध्यक्षा गौरी भानू हे मात्र देशाबाहेर फरार झाले आहेत.

सोमवारी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात, ‘न्यू इंडिया’वर नियुक्त प्रशासकाशी सल्लामसलत करून बँकेच्या रोखतेच्या स्थितीचा आढावा घेतल्याचे रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे. बँकेकडील रोख पाहता, २७ फेब्रुवारीपासून प्रत्येक ठेवीदाराला २५,००० रुपयांपर्यंत ठेव काढण्याची परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

रिझर्व्ह बँकेने बँकेचे कामकाज पाहण्यासाठी स्टेट बँकेचे माजी मुख्य महाव्यवस्थापक श्रीकांत यांची प्रशासक म्हणून नियुक्ती केली आहे. प्रशासकांना मदत करण्यासाठी ‘सल्लागार समिती’ देखील नियुक्त करण्यात आली आहे. प्रशासकाच्या सल्लागार समितीची पुनर्रचना करण्यात आली असून, त्यात आता स्टेट बँकेचे माजी महाव्यवस्थापक रवींद्र सप्रा, सारस्वत सहकारी बँकेचे माजी उपमहाव्यवस्थापक रवींद्र तुकाराम चव्हाण आणि सनदी लेखापाल आनंद एम. गोलास यांचा समावेश करण्यात आला आहे.

अटीतील नवीन शिथिलतेमुळे, एकूण ठेवीदारांपैकी ५० टक्क्यांहून अधिक ठेवीदार हे खात्यातील संपूर्ण शिल्लक रक्कम काढू शकतील, असे रिझर्व्ह बँकेने स्पष्ट केले आहे. ठेवीची रक्कम काढण्यासाठी खातेदार बँकेच्या शाखेचा तसेच एटीएमचा देखील वापर करू शकतील. तथापि, काढता येणारी एकूण रक्कम प्रति ठेवीदार २५,००० रुपये किंवा त्यांच्या खात्यात उपलब्ध असलेली शिल्लक यापैकी जी कमी असेल ती, या मर्यादेतच असावी, असे रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे.

महाराष्ट्रासह गुजरातमध्ये विस्तार असलेल्या या बँकेच्या २८ शाखा आहेत. बँकेच्या बहुतांश शाखा या मुंबई महानगर क्षेत्रात आहेत. पात्र ठेवीदारांना ठेव विमा आणि पत हमी महामंडळाकडून (डीआयसीजीसी) त्यांच्या ठेवींवर ५ लाख रुपयांपर्यंतचा ठेवी विमा दाव्याची रक्कम मिळण्यास पात्र असेल. त्या संबंधाने प्रयत्न सुरू असून ही प्रक्रिया महिनाभरात पूर्ण होणे अपेक्षित आहे.