चांदीचे दागिने आणि वस्तूंच्या अस्सलतेची खूण असणारे हॉलमार्किंग बंधनकारक करण्याची मागणी ग्राहकांकडून केली जात असून, सोन्याप्रमाणेच चांदीच्या दागिन्यांचेही शुद्धता प्रमाणन सक्तीने लागू करण्याची व्यवहार्यता तपासण्याचे निर्देश केंद्रीय अन्न व ग्राहक कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सोमवारी भारतीय मानक संस्थेला (बीआयएस) दिले.
चांदीच्या दागिन्यांची शुद्धता प्रमाणित करणारे हॉलमार्किंग सध्या ऐच्छिक आहे. सोन्याप्रमाणे चांदीच्या दागिन्यांचे हॉलमार्किंग अनिवार्य केले जावे, अशी ग्राहकांकडून मागणी मात्र सुरू आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री जोशी हे भारतीय मानक संस्थेच्या ७८ व्या स्थापनादिनानिमित्त बोलताना या संबंधाने चाचपणी करण्याचे निर्देश दिले.
हेही वाचा >>>Gold Silver Price Today : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोने-चांदीच्या दरात घसरण! जाणून घ्या, तुमच्या शहरातील भाव
ते म्हणाले की, चांदीचे हॉलमार्किंग बंधनकारक करण्याची मागणी होतच आहे. सरकारकडून या दिशेने पावले उचलण्यास सुरूवात झाली आहे. भारतीय मानक संस्थेने याबाबत विचार करून, प्रस्तावाची व्यवहार्यता तपासून निर्णय घेताना, ग्राहक आणि सराफांशी चर्चा करावी. ही सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सरकार अंतिम निर्णय घेईल.
भारतीय मानक संस्थेचे महासंचालक प्रमोद कुमार तिवारी याबाबत म्हणाले की. संस्थेकडून ३ ते ६ महिन्यांत चांदीचे हॉलमार्किंग बंधनकारक केले जाऊ शकते. सध्या या क्षेत्रातील सर्व घटकांशी आम्ही चर्चा करीत आहोत. आमच्या चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या असून, सर्व घटकांची या प्रस्तावाला संमती आहे. चांदीचे दागिने आणि वस्तूंवर अक्षर आणि अंकांचा समावेश असलेला सहा आकडी विशिष्ट क्रमांक टाकण्याबाबत सध्या चर्चा सुरू आहे.
सोन्याचे हॉलमार्किंग २०२१ पासूनच
सोन्याचे हॉलमार्किंग जून २०२१ पासून बंधनकारक करण्यात आले. आता देशातील ३६१ जिल्ह्यांत सोन्याचे हॉलमार्किंग केले जाते. सध्या ग्राहकांकडून होणाऱ्या सोन्याच्या दागिन्यांपैकी ९० टक्के हॉलमार्किंग केलेले असते. हॉलमार्किंग सुरू झाल्यापासून सोन्याच्या ४४.२८ कोटी दागिन्यांची विशिष्ट क्रमांक मुद्रित करून विक्री झालेली आहे.