मुंबईः अत्याधुनिक फोर्जिंग सुविधा पूर्णपणे नव्या रूपात उभारण्यासाठी ६५० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची घोषणा हॅपी फोर्जिंग्ज कंपनीने सोमवारी केली. आशियातील या प्रकारचा हा सर्वात मोठा तर जगातील दुसऱ्या क्रमांकाचा प्रकल्प या माध्यमातून कंपनी साकारणार असून, तो मुख्यतः बिगरवाहन उद्योगांना सेवा देणार आहे.
हॅपी फोर्जिंग्जच्या संचालक मंडळाने सोमवारी ६५० कोटी रुपयांच्या भांडवली गुंतवणुकीच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. कंपनी गुंतागुंतीच्या, सुरक्षेसाठी महत्त्वपूर्ण आणि अचूकतेसाठी वापरला जाणाऱ्या यंत्रांच्या सुट्या भागांचे उत्पादन करते. नवीन प्रकल्पांमुळे कंपनीच्या उत्पादन क्षमतेत मोठी वाढ होणार आहे. कंपनीकडून जास्त वजनाच्या सुट्या भागांचे उत्पादन केले जाणार आहे. या प्रकल्पामुळे कंपनी भविष्यात ३ हजार किलोग्रॅम क्षमतेपर्यंत वजनाचे सुटे भाग बनवू शकेल.
याबाबत कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आशीष गर्ग म्हणाले की, फोर्जिंग क्षेत्राची बाजारपेठ खूप मोठी असून, त्यात संधीही खूप आहेत. यामुळे आम्ही विस्ताराचे धोरण हाती घेतले आहे. मोठ्या सुट्या भागांची मागणी वाढत असली तरी पुरवठादार मर्यादित आहेत. या गुंतवणुकीमुळे फोर्जिंग क्षेत्रातील आमच्या वाढीला गती मिळेल. याचबरोबर कंपनीचा निर्यात वाढून नफ्यातही वाढ होईल.
© The Indian Express (P) Ltd