मुंबई : रिझर्व्ह बँकेने व्याजदर वाढीला गत आठवड्यात तात्पुरती स्थगिती दिल्यानंतर, आता खासगी क्षेत्रातील आघाडीच्या एचडीएफसी बँकेने विविध मुदतीच्या निधीवर आधारित कर्ज व्याजदरात (एमसीएलआर) ०.८५ टक्क्यापर्यंत कपात केली असून, सुधारित व्याज दर सोमवार, १० एप्रिलपासूनच लागू झाल्याची माहिती बँकेच्या संकेतस्थळावर देण्यात आली आहे.त्याउलट सार्वजनिक क्षेत्रातील कॅनरा बँकेने निधीवर आधारित कर्ज व्याजदरात (एमसीएलआर) ८.६० टक्क्यांवरून, ८.६५ टक्के अशी वाढ जाहीर केली. बुधवार, १२ एप्रिलपासून लागू होणाऱ्या या सुधारित दरामुळे, बँकेची एमसीएलआर संलग्न गृह कर्ज आणि अन्य ग्राहक कर्जांचे व्याजदर वाढणार आहेत.
एचडीएफसी बँकेने ‘एमसीएलआर’वर आधारित व्याजदर सहा महिने मुदतीपर्यंतच्या कर्जांसाठी कमी केले आहेत. सुधारित व्याजदर एका दिवसासाठी ७.८० टक्के, एका महिन्यासाठी ७.९५ टक्के, तीन महिन्यांसाठी ८.३० टक्के आणि सहा महिन्यांसाठी ८.७० टक्के झाले आहेत. एक वर्ष व त्यावरील मुदतीच्या कर्जांच्या व्याजदरात बँकेने कोणताही बदल केलेला नाही.