खासगी क्षेत्रातील आघाडीच्या एचडीएफसी बँकेने विविध कालावधीच्या निधीवर आधारित कर्ज व्याजदरात (एमसीएलआर) १५ आधारबिंदूपर्यंत वाढीची घोषणा केली. नवीन दरवाढ बुधवारपासूनच (७ जून) लागू झाली आहे. यातून बँकेच्या गृह, वाहन, वैयक्तिक अशा सर्व ग्राहक कर्जदारांवरील हप्त्यांचा भार वाढणार आहे.
एचडीएफसी बँकेचे ‘एमसीएलआर’वर आधारित एक वर्ष मुदतीच्या कर्जावरील व्याजदर ९.०५ टक्क्यांवर गेले आहेत. याचप्रमाणे एका दिवसासाठी ८.१० टक्के, तर तीन महिने आणि सहा महिने कालावधीच्या कर्जावरील व्याजदर अनुक्रमे ८.५० टक्के आणि ८.८५ टक्के झाला आहे. तसेच तीन वर्षे मुदतीच्या कर्जासाठी दर आता ९.२० टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आले आहेत.
हेही वाचाः रिझर्व्ह बँकेच्या सुवर्णसाठ्यात ५ वर्षांत ४० टक्के वाढ; ‘इतके’ टन सोने केले खरेदी
महागाईवर नियंत्रणासाठी रिझर्व्ह बँकेने गेल्या वर्षाच्या मे महिन्यापासून रेपो दरात २.५ टक्क्यांची वाढ केली असून, तो आता ६.५० टक्क्यांवर पोहोचला आहे. मात्र एप्रिल २०२३ मध्ये पार पडलेल्या पतधोरणात रिझर्व्ह बँकेने व्याजदर वाढीला विराम दिला. आता पुन्हा एकदा व्याजदर जैसे थे ठेवण्यात आले आहेत. परिणामी, यातून कर्जदारांना किंचित दिलासा अपेक्षित असताना एचडीएफसी बँकेने मात्र वेगळी वाट चोखाळली असल्याचे दिसून येते.
हेही वाचाः २ हजार रुपयांच्या १.८० लाख कोटी रुपये मूल्याच्या नोटांची बँकवापसी – आरबीआय