मुंबई: रिझव्र्ह बँकेच्या व्याजदर वाढीला प्रतिसाद देत खासगी क्षेत्रातील आघाडीच्या एचडीएफसी बँकेने निधीवर आधारित कर्ज व्याजदरात (एमसीएलआर) बुधवारी ०.४० टक्क्यांपर्यंत वाढीची घोषणा केली. सुधारित व्याज दर बुधवारपासूनच (७ डिसेंबर) लागू झाला असून बँकेच्या गृह, वाहन, वैयक्तिक अशा सर्व ग्राहक कर्जदारांवरील हप्तय़ांचा भार वाढणार आहे.
महागाईवर नियंत्रणासाठी रिझव्र्ह बँकेने मे महिन्यापासून रेपो दरात सलग पाच वेळा वाढ केली आहे. मध्यवर्ती बँकेने बुधवारी व्याजदर वाढीची घोषणा करताच काही तासांच्या अवधीत एचडीएफसी बँकेने कर्जावरील व्याजदर वाढीची घोषणा केली. आता इतर बँकांकडूनदेखील लवकरच व्याजदर वाढीची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे.
सर्वसाधारणपणे ‘एमसीएलआर’चे दर एक ते तीन वर्षांसाठी निश्चित करण्यात आलेले असतात. ‘एमसीएलआर’वर आधारित एक वर्ष मुदतीच्या कर्जावरील एचडीएफसी बँकेचे व्याजदर आता ८.६० टक्क्यांवर गेले आहेत. याचप्रमाणे एका दिवसासाठी ८.३० टक्के, तर तीन वर्षे मुदतीच्या कर्जासाठी दर आता ८.८० टक्क्यांपर्यंत वाढविण्यात आले आहेत. विविध कालावधीच्या ग्राहक कर्जावरील व्याज दरात ०.५० ते ०.४० टक्क्यांपर्यंत वाढ करण्यात आली आहे.