मुंबई: खासगी क्षेत्रातील सर्वात मोठ्या एचडीएफसी बँकेने गुरुवारी निवडक मुदतीच्या निधी-आधारित कर्ज दरात (एमसीएलआर) ५ आधार बिंदूंनी (०.०५ टक्के) वाढीचा निर्णय घेतला. एचडीएफसी बँकेच्या वेबस्थळावर उपलब्ध तपशिलानुसार, वाहन कर्ज आणि वैयक्तिक कर्ज या सारख्या बहुतांश ग्राहक कर्जांच्या दर निर्धारणासाठी मानदंड म्हणून वापरात येणारा एक वर्ष कालावधीचा ‘एमसीएलआर’ संलग्न व्याजाचा दर ९.४५ टक्के राखून ठेवण्यात आला आहे. तर त्यापेक्षा कमी कालावधीच्या ‘एमसीएलआर’संलग्न व्याजदर ९.१० टक्क्यांवरून, ९.१५ टक्क्यांपर्यंत ते ९.२० टक्क्यांपर्यंत वाढले आहेत.
इतर मुदतीच्या कर्ज प्रकारांवरील व्याजाचे दर अपरिवर्तित ठेवण्यात आले आहेत, असे बँकेने स्पष्ट केले आहे. व्याजाचे नवीन दर, गुरुवार, ७ नोव्हेंबर २०२४ पासून लागू झाले आहेत. रिझर्व्ह बँकेने कर्जाचा व्याज दर (रेपो दर) सलग दहा बैठकांतील आढाव्यानंतर, म्हणजेच जवळपास दीड वर्षे कोणताही बदल न करता ६.५ टक्के पातळीवर कायम ठेवले आहेत. त्या आधी वर्षभराच्या अल्पावधीत व्याजाचे दर मध्यवर्ती बँकेकडून तब्बल अडीच टक्क्यांनी वाढविले गेले आहेत. तथापि सध्या बँकिंग क्षेत्र कर्ज मागणी बरोबरीने ठेवींतील वाढीचा दरही मंदावल्याच्या समस्येने ग्रस्त असून, त्यांचे व्याजाचे दर बराच काळ आहे त्या पातळीवर स्थिरावले आहेत.