मुंबई : खासगी क्षेत्रातील आघाडीची बँक असलेल्या एचडीएफसी बॅंकेला सरलेल्या डिसेंबर तिमाहीत १७,६५७ कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत त्यात २.३ टक्क्यांची वाढ झाली आहे. बँकेचा पतविस्तार सरलेल्या तिमाहीत कमी झाल्याने एकूण नफ्यावर परिणाम झाला आहे. मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत बँकेने १६,३७३ कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला होता. मात्र मागील सप्टेंबर तिमाहीच्या १६,८२०.९७ कोटी रुपयांपेक्षा नफा किंचित कमी आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बँकेचे एकूण उत्पन्न आर्थिक वर्ष २०२५ च्या तिसऱ्या तिमाहीत ८१,७२० कोटी रुपयांवरून ८७,४६० कोटी रुपयांपर्यंत वधारले आहे. संकलित एकूण उत्पन्न मागील वर्षाच्या ऑक्टोबर-नोव्हेंबर तिमाहीच्या अखेरीस असलेल्या १,१५,०१६ कोटी रुपयांवरून १,१२,१९४ कोटी रुपयांवर घसरले आहे.

हेही वाचा : रिझर्व्ह बँक महागाईदरबाबत काय निर्णय घेणार?

मालमत्तेच्या गुणवत्तेच्या बाबतीत, बँकेचे एकूण अनुत्पादक मालमत्ता (एनपीए) डिसेंबर २०२४ च्या अखेरीस एकूण कर्जाच्या १.४२ टक्क्यांपर्यंत वधारले आहे, जे गेल्या वर्षी १.२६ टक्के नोंदवले गेले होते. तर निव्वळ बुडीत कर्ज डिसेंबर २०२३ मधील ०.३१ टक्क्यांवरून ०.४६ टक्क्यांपर्यंत वधारले आहे.

बुधवारच्या सत्रात एचडीएफसी बँकेचा समभाग १.४४ टक्क्यांनी म्हणजेच २३.६५ रुपयांनी वधारून १,६६६.०५ रुपयांवर बंद झाला. सध्याच्या शेअरच्या बाजारभावानुसार बँकेचे १२.७४ लाख कोटी रुपयांचे बाजारभांडवल आहे.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hdfc bank profit increased by 2 3 percent to 17657 crores print eco news css