वृत्तसंस्था, नवी दिल्ली

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

देशातील खासगी क्षेत्रातील सर्वांत मोठी बँक असलेल्या एचडीएफसी बँकेला जूनअखेर संपलेल्या तिमाहीत ११,९५२ कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत नफ्यात ३० टक्के वाढ नोंदविण्यात आली आहे. बहुतांश विश्लेषकांच्या अपेक्षांच्या तुलनेत बँकेने किती तरी सरस कामगिरीची नोंद केली आहे.चालू आर्थिक वर्षातील एप्रिल ते जून या पहिल्या तिमाहीत बँकेच्या निव्वळ महसुलात २६.९ टक्के वाढ होऊन ते ३२,८२९ कोटी रुपयांवर पोहोचले आहे. मागील वर्षी पहिल्या तिमाहीत बँकेचा महसूल २५,८७० कोटी रुपये होता. याचबरोबर निव्वळ व्याज उत्पन्नात २१.१ टक्के वाढ होऊन ते २३,५९९ कोटी रुपये झाले आहे. मागील वर्षी याच तिमाहीत ते १९,४८१ कोटी रुपये होते.

बँकेच्या एकूण थकीत कर्ज मालमत्तांमध्ये पहिल्या तिमाहीत किंचित वाढ होऊन त्या १.१७ टक्क्यांवर पोहोचल्या आहेत. मार्चअखेर संपलेल्या तिमाहीत थकीत कर्जांचे प्रमाण १.१२ टक्के होते. बँकेच्या निव्वळ थकीत कर्जांचे प्रमाण जूनअखेरीस मात्र ०.३० टक्क्यांवर घसरले आहे.

जगातील सातव्या क्रमांकाची मोठी बँक

एचडीएफसी बँकेने सोमवारी १०० अब्ज डॉलरच्या बाजारभांडवलाचा टप्पा गाठला. अपेक्षेपेक्षा सरस नोंदवल्या गेलेल्या तिमाही निकालांच्या परिणामी एचडीएफसी बँकेच्या समभाग मूल्याने दोन टक्क्यांहून अधिक झेप घेतली. परिणामी, भांडवली बाजारात बँकेचे बाजारमूल्य १५१ अब्ज डॉलर म्हणजेच १२.३८ लाख कोटी रुपयांवर पोहोचले. यामुळे ती जगातील सातव्या क्रमांकाची मोठी बँक बनली आहे. जगातील सर्वांत मोठ्या बँकांमध्ये जेपी मॉर्गन, बँक ऑफ अमेरिका, आयसीबीसी चायना, अग्रिकल्चर बँक ऑफ चायना, वेल्स फार्गो आणि एचएसबीसी या बँकांचा समावेश आहे.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hdfc bank profit rises 30 percent to rs 11 2 crore print eco news amy