लोकसत्ता व्यापार प्रतिनिधी
मुंबई : खासगी क्षेत्रातील आघाडीच्या एचडीएफसी बँकेने विविध कालावधीच्या निधीवर आधारित कर्ज व्याजदरात (एमसीएलआर) ५ आधारबिंदूंनी वाढीची घोषणा मंगळवारी केली. नवीन दरवाढ मंगळवारपासूनच (७ नोव्हेंबर) लागू झाली असून, बँकेच्या गृह, वाहन, वैयक्तिक अशा सर्व ग्राहक कर्जदारांवरील हप्त्यांचा भार यातून वाढणार आहे.
सर्वसाधारणपणे ‘एमसीएलआर’चे दर एक ते तीन वर्षांसाठी निश्चित करण्यात आलेले असतात. ‘एमसीएलआर’वर आधारित एक वर्ष मुदतीच्या कर्जावरील एचडीएफसी बँकेचे व्याजदर ९.२० टक्क्यांवर गेले आहेत. याचप्रमाणे एका दिवसासाठी ८.६० टक्क्यांवरून तो आता ८.६५ टक्के करण्यात आला आहे. तर तीन महिने आणि सहा महिने कालावधीच्या कर्जावरील व्याजदर अनुक्रमे ८.९० टक्के आणि ९.१५ टक्के झाला आहे. तसेच तीन वर्षे मुदतीच्या कर्जासाठी दर आता ९.३० टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आले आहेत.
आणखी वाचा-भारतीय अन्न महामंडळ(FCI) करणार ५० लाख मेट्रिक टन गहू अन् २५ लाख मेट्रिक टन तांदळाचे वितरण
रिझर्व्ह बँकेने गेल्या वर्षी मे महिन्यापासून आतापर्यंत रेपो दरात २.५ टक्क्यांची वाढ करत तो ६.५० टक्क्यांवर नेला आहे. परिणामी बँकांनीदेखील कर्जाचे दर वाढविले आहे. मात्र सलग चार पतधोरणांमध्ये रिझर्व्ह बँकेने रेपो दरात वाढ करण्यात आलेली नाही. मात्र बँकांनी केलेली कर्जावरील व्याजदर वाढीच्या तुलनेत अजूनही मुदत ठेवींवर देय व्याजदरात वाढ केलेली नाही.