पीटीआय, न्यूयॉर्क

अमेरिकेतील फर्स्ट रिपब्लिक बँकेला संकटातून तारण्यासाठी ११ मोठ्या बँकांनी ३० अब्ज डॉलरची मदत योजना गुरुवारी जाहीर केली. आठवडाभराच्या कालावधीत बुडण्याच्या वाटेवर असलेली ही येथील तिसरी बँक असून, मदतीचा हात मिळाल्यामुळे तिला सावरता येऊ शकेल.

कॅलिफोर्नियास्थित फर्स्ट रिपब्लिक बँकेचा ग्राहकवर्ग हा सिलिकॉन व्हॅली बँकेप्रमाणेच आहे. काही तासांत सिलिकॉन व्हॅली बँकेतून ठेवीदारांनी ४० अब्ज डॉलर काढून घेतल्याने ती बुडाली होती. फर्स्ट रिपब्लिक बँकेचीही हीच स्थिती आहे. बँकेकडील एकूण ठेवी ३१ डिसेंबर २०२२ अखेर १७६.४ अब्ज डॉलर होत्या. अनेक बँकांमधून विमा संरक्षण नसलेल्या मोठ्या प्रमाणात ठेवी काढल्या जात आहेत. अमेरिकेतील ठेव विमा मंडळ – ‘फेडरल डिपॉझिट इन्शुरन्स कॉर्पोरेशन’कडून विम्याचे संरक्षण प्राप्त अडीच लाख डॉलरच्या मर्यादेपेक्षा जास्त रकमेच्या या ठेवी आहेत. याचाच फटका फर्स्ट रिपब्लिक बँकेला बसला. परिणामी बँकेच्या समभागात सोमवारी (१३ मार्च) ६० टक्के घसरण झाली होती.

हेवा आणि सहयोग

जे. पी. मॉर्गन आणि अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हकडून अतिरिक्त निधी मिळाल्याचे ‘फर्स्ट रिपब्लिक बँके’ने जाहीर करूनही समभाग कोसळले होते. आता अमेरिकेतील ११ मोठ्या बँकांनी फर्स्ट रिपब्लिकसाठी ३० अब्ज डॉलरचे मदत पॅकेज जाहीर केले आहे. मदतीसाठी पुढे येऊन बँकांनी तिच्यावर विश्वास दर्शवला आहे. मागील काही काळापासून बँकिंग उद्योगाला या बँकेबद्दल हेवा वाटत होता. कारण या बँकेचा ग्राहकवर्ग हा श्रीमंत गटातील होता. त्यातील बहुतांश अब्जाधीश होते. फेसबुकचे संस्थापक मार्क झकरबर्ग यांनीही या बँकेकड़ून कर्ज घेतले होते.

२००८ च्या संकटाच्या स्मृती जाग्या

फर्स्ट रिपब्लिकसाठी अमेरिकेतील अकरा मोठ्या बँकांनी मदत पॅकेज जाहीर केल्याने २००८ च्या आर्थिक संकटाच्या स्मृती जागवल्या गेल्या आहेत. त्यावेळी सुरुवातीला बँकांनी एकत्र येऊन कमकुवत बँकांना आर्थिक मदत केली होती. नंतर काही बँकांनी घाईघाईत इतर बँका खरेदी करून हे संकट पसरू नये, यासाठी प्रयत्न केले होते.

Story img Loader