मुंबई : माहिती-तंत्रज्ञान सेवा क्षेत्रातील कंपनी हेक्झावेअर टेक्नॉलॉजीजची प्रारंभिक समभाग विक्री (आयपीओ) येत्या बुधवार, १२ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. १४ फेब्रुवारीपर्यंत कंपनीच्या समभागांसाठी प्रत्येकी ६७४ रुपये ते ७०८ रुपये किंमतीदरम्यान गुंतवणूकदारांना अर्ज करता येईल. सुकाणू गुंतवणूकदार ११ फेब्रुवारी रोजी या प्रक्रियेत बोली लावतील.
कंपनी या माध्यमातून ८,७५० कोटी रुपयांचा निधी उभारू इच्छित असून, मागील दोन दशकांतील ‘आयपीओ’द्वारे कोणत्याही आयटी क्षेत्रातील कंपनीची ही सर्वात मोठी निधी उभारणी असेल. मुंबईत मुख्यालय असलेल्या हेक्झावेअर टेक्नॉलॉजीजची प्रवर्तक सीए मॅग्नम होल्डिंग्ज (कार्लाइल समूहाचा एक घटक) आंशिक समभाग विक्रीच्या माध्यमातून म्हणजेच ओएफएसच्या माध्यमातून त्यांच्याकडील भागभांडवली हिश्शाची विक्री करणार आहे. सध्या सीए मॅग्नम होल्डिंग्जचा या कंपनीमध्ये ९५.०३ टक्के हिस्सेदारी आहे, जी आयपीओपश्चात ७४.१ टक्क्यांपर्यंत खाली येईल. आयपीओमधून उभारला जाणारा संपूर्ण निधी प्रवर्तकांना मिळणार आहे.
सप्टेंबरअखेर समाप्त आर्थिक वर्षातील पहिल्या नऊ महिन्यांमध्ये, कंपनीचा निव्वळ नफा ८५३.३ कोटी रुपये आणि महसूल ८,८२० कोटी रुपये होता. कंपनीने भागविक्रीतील ५० टक्के हिस्सा पात्र संस्थात्मक खरेदीदारांसाठी, ३५ टक्के हिस्सा किरकोळ गुंतवणूकदारांसाठी आणि उर्वरित १५ टक्के गैर-संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवला आहे. कंपनीचे समभाग मुंबई शेअर बाजार आणि राष्ट्रीय शेअर बाजारात सूचिबद्ध केले जाणार आहे.
टीसीएसनंतर सर्वात मोठी भागविक्री
टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने (टीसीएस) दोन दशकांपूर्वी प्रारंभिक समभाग विक्री करून ४,७०० कोटी रुपये उभारले होते. त्यानंतर ‘आयटी’ क्षेत्रातील त्यापेक्षा मोठी निधी आहे. हेक्झावेअर टेक्नॉलॉजीज ही एक जागतिक डिजिटल आणि तंत्रज्ञान सेवा कंपनी आहे, ज्याच्या केंद्रस्थानी कृत्रिम प्रज्ञा (एआय) तंत्रज्ञान आहे. मुख्यत्वे वित्तीय सेवा, आरोग्यसेवा आणि विमा, व्यावसायिक सेवा; बँकिंग, प्रवास आणि वाहतूक या क्षेत्रातील कंपन्यांना हेक्झावेअर सेवा पुरवते आणि तिच्या ग्राहकांमध्ये अमेरिका, युरोप आणि आशिया-प्रशांत क्षेत्रातील फॉर्च्युन ५०० श्रेणीतील ३१ कंपन्यांचा समावेश आहे.
सप्टेंबर अखेर संपलेल्या आर्थिक वर्षातील पहिल्या नऊ महिन्यांमध्ये, कंपनीचा निव्वळ नफा ८५३.३ कोटी रुपये आणि महसूल ८,८२० कोटी रुपये होता. कंपनीने इश्यू आकाराचा अर्धा भाग पात्र संस्थात्मक खरेदीदारांसाठी, ३५ टक्के किरकोळ गुंतवणूकदारांसाठी आणि उर्वरित १५ टक्के गैर-संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवला आहे. कंपनीचे समभाग मुंबई शेअर बाजार आणि राष्ट्रीय शेअर बाजारात सूचिबद्ध केले जाणार आहे.