नवी दिल्ली : अन्नधान्याच्या किमतीत वाढ झाल्याने किरकोळ महागाईचा दर नोव्हेंबरमध्ये ५.५५ टक्क्यांवर म्हणजेच तीन महिन्यांतील उच्चांकी पातळीवर पोहोचल्याचे मंगळवारी जाहीर झालेल्या सरकारी आकडेवारीने स्पष्ट केले. त्याआधीच्या ऑक्टोबर महिन्यात तो ४.८७ टक्क्यांपर्यंत नरमला होता, तर गेल्या वर्षी नोव्हेंबर (२०२२) महिन्यात किरकोळ महागाईचा स्तर ५.८८ टक्क्यांवर नोंदवला गेला होता.
चालू वर्षात ऑगस्टमधील ६.८३ टक्के पातळीपासून महागाईचा उतरता क्रम कायम होता. ऑक्टोबरच्या तुलनेत त्यात पुन्हा ७० आधारबिंदूंनी वाढ दिसून आली आहे. तरी हा दर सलग तीन महिने रिझर्व्ह बँकेच्या सहनशील पातळीच्या २ ते ६ टक्क्यांच्या मर्यादेत राहिला आहे. मात्र ४ टक्क्यांच्या मध्यम-मुदतीच्या लक्ष्यापेक्षा हा दर सलग ५० महिन्यांत अधिक राहिला आहे.
हेही वाचा >>> राजस्थानचे नवे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांच्याकडे संपत्ती किती? माहिती जाणून घ्या
सरलेल्या नोव्हेंबरमध्ये कडाडलेल्या अन्नधान्य आणि अन्य भाज्यांच्या किमती वाढवणाऱ्या प्रभावामुळे पुन्हा महागाई दराने तीन महिन्यातील उच्चांकी पातळीशी बरोबरी साधली आहे. अन्नधान्य श्रेणीतील महागाई दर ८.७० टक्क्यांवर पोहोचला आहे. जो ऑक्टोबर महिन्यात नोंदवलेल्या ६.६१ टक्क्यांच्या तुलनेत वाढला आहे. भाज्यांच्या किमतींचे एकूण ग्राहक किंमत निर्देशांकातील भारमान १७.७० टक्के इतके आहे. गेल्या महिनाभरात कांद्याच्या कडाडलेल्या किमतीचे प्रतिबिंब त्यात दिसत आहे. मासिक आधारावर कांदा आणि टोमॅटोच्या किमतीत अनुक्रमे ४८ टक्के आणि ४१ टक्क्यांची वाढ झाली. डाळी आणि फळांमधील महागाई दर अनुक्रमे २०.२३ टक्के आणि १०.९५ टक्के असा वाढता राहिला आहे. तर इंधन आणि ऊर्जा श्रेणीतील महागाई घटली असून ती (उणे) -०.७७ नोंदवली गेली. गेल्याच आठवडय़ात, रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीने महागाई वाढीची जोखीम लक्षात घेऊन व्याजदर आहे त्या पातळीवर कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. नोव्हेंबर आणि डिसेेंबरमधील महागाई दर पुन्हा उसळी घेतील, असे मध्यवर्ती बँकेचेही भाकीत होते.