पीटीआय, नवी दिल्ली

देशाच्या निर्मिती क्षेत्राने सरलेल्या मार्च महिन्यात सक्रियता दर्शवत दमदार झेप घेतल्याचे मासिक सर्वेक्षणातून बुधवारी पुढे आले. मागणीतील तेजीमुळे उत्पादनात झालेली वाढ, नवीन कार्यादेश आणि नवीन कामाचा ओघ याच्या जोरावर निर्मिती क्षेत्राचा ‘पीएमआय’ निर्देशांक सरलेल्या मार्चमध्ये आठ महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला, असे एका मासिक सर्वेक्षणात बुधवारी म्हटले आहे.देशातील निर्मिती क्षेत्राचा प्रवास नोंदविणाऱ्या ‘एचएसबीसी इंडिया’द्वारे, निर्मिती क्षेत्रातील खरेदी व्यवस्थापकांचा कल जोखणाऱ्या सर्वेक्षणावर आधारित (पीएमआय) निर्देशांक मार्च महिन्यासाठी ५८.१ अंशांवर पोहोचला आहे. त्याआधीच्या महिन्यात म्हणजेच फेब्रुवारीमध्ये तो ५६.३ असा नोंदला गेला होता.

फेब्रुवारीमध्ये, नवीन कार्यादेशातील घसरण आणि उत्पादनात सौम्य वाढ झाल्यामुळे भारताचा उत्पादन पीएमआय १४ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर घसरला होता. मात्र उत्पादन क्षेत्राच्या वाढीने फेब्रुवारीमध्ये गमावलेला जोम पुन्हा प्राप्त केला आहे. मुख्यतः कारखान्यांना मिळालेल्या नवीन कार्यादेशामुळे ही वाढ झाली आहे. मार्चमध्ये जुलै २०२४ नंतर एकूण विक्रीत सर्वाधिक वाढ झाली, ज्यामध्ये कंपन्यांनी सकारात्मक ग्राहकहित, अनुकूल मागणी परिस्थिती आणि यशस्वी विपणन कारणीभूत ठरले आहे, असे सर्वेक्षणात नमूद केले आहे.

सरलेल्या २०२४-२५ या आर्थिक वर्षाच्या अखेरीस कंपन्यांनी उत्पादनाचे प्रमाण वाढविले. विस्ताराचा दर तीव्र राहिला आहे. मार्चमध्ये नवीन निर्यात कार्यादेशांमध्ये जोरदार वाढ होत राहिली असली तरी, वाढीचा वेग तीन महिन्यांच्या नीचांकी पातळीवर आला. आंतरराष्ट्रीय कार्यादेशात किंचित घट झाली असली तरी, एकूण मागणीची गती मजबूत राहिली आणि नवीन कार्यादेश निर्देशांकाने ६१.५ चा आठ महिन्यांचा उच्चांक नोंदवला. मजबूत मागणीमुळे कंपन्यांच्या माल-साठ्यात (इन्व्हेंटरी) तीन वर्षांहून अधिक काळातील सर्वात जलद घट झाली आहे, असे एचएसबीसीच्या मुख्य अर्थतज्ज्ञ प्रांजुल भंडारी म्हणाल्या. वाढत्या मागणीमुळे कंपन्यांना ग्राहकांची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी त्यांच्या कच्च्या मालासाठी गुंतवणूक करावी लागली, ज्यामुळे जानेवारी २०२२ नंतर तयार मालसाठ्यात सर्वात वेगाने घट झाली.