मुंबई : खनिज तेलाच्या किमतीत झालेली वाढ आणि जागतिक बाजारातील मंदीचा कल यामुळे बुधवारी देशांतर्गत आघाडीवर प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये १ टक्क्यांपर्यंत घसरण झाली. बँकिंग, वित्तीय सेवा आणि ऊर्जा समभागांमध्ये विक्रीच्या दबावामुळेही निर्देशांकांना अधिक झळ बसली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ५५१.०७ अंशांनी घसरून ६५,८७७.०२ पातळीवर बंद झाला. दिवसभरात त्याने ५८५.९९ अंश गमावत ६५,८४२.१० अंशांची सत्रातील नीचांकी पातळी गाठली. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीने १४०.४० अंश गमावले आणि तो टक्क्यांनी घसरून १९,६७१.१० पातळीवर स्थिरावला.

सेन्सेक्समध्ये बजाज फायनान्सच्या समभागात ३ टक्क्यांची सर्वाधिक घसरण झाली. त्यापाठोपाठ बजाज फिनसर्व्ह, अॅक्सिस बँक, एचडीएफसी बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज, एनटीपीसी, आयसीआयसीआय बँक आणि इंडसइंड बँकेचे समभाग पिछाडीवर होते. तर टाटा मोटर्स, सन फार्मा, मारुती आणि महिंद्र अँड महिंद्र यांचे समभाग सर्वाधिक तेजीत होते.

विप्रोची निराशाजनक कामगिरी

माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीची कंपनी विप्रोने सप्टेंबर अखेर तिमाहीत २,६६७.३ कोटींचा निव्वळ नफा नोंदवला. वर्ष भरापूर्वी याच तिमाहीत कंपनीने २,६४९.१ कोटी रुपयांचा नफा मिळविला होता. परिणामी वार्षिक आधारावर त्यात वाढ झाली नसल्याने कंपनीची तिमाही कामगिरी निराशाजनक राहिली आहे. तसेच सप्टेंबर २०२२ मधील याच तिमाहीत नोंदवलेल्या २२,५३९.७ कोटी रुपयांच्या तुलनेत एकत्रित महसूल कमी होऊन २२,५१५.९ कोटी रुपयांवर आला आहे.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hike in crude oil prices sensex falls by 551 points print eco news asj