मुंबई: हिंडाल्को इंडस्ट्रीजने शुक्रवारी पुण्यातील चाकण येथे विद्युत वाहनांसाठी (ईव्ही) पूरक घटकांच्या उत्पादन सुविधेचे अनावरण केले, जे हलक्या वजनाच्या, घात-रोधक बॅटरी उपाययोजनांच्या वाढत्या मागणीला पूर्ण करण्यासाठी विकसित केले गेले आहे.सुमारे ५०० कोटी रुपयांच्या भांडवली गुंतवणुकीसह आणि औद्योगिक वसाहतीतील ५ एकर जागेवर पसरलेल्या चाकण येथील नवीन सुविधेमुळे जवळपास १,००० नोकऱ्या निर्माण होणे अपेक्षित आहे आणि आयातीवरील अवलंबित्व कमी करण्याच्या सरकारच्या ‘मेक इन इंडिया’ दृष्टिकोनाशी ते पूर्णपणे सुसंगत आहे, असे कंपनीने म्हटले आहे. ही नवीन सुविधा म्हणजे देशातील ईव्ही परिसंस्थेचे आयातीवर अवलंबित्व कमी करण्यापासून उच्च-कार्यक्षमता असलेल्या, स्थानिकीकृत ॲल्युमिनियमवर आधारीत उपायांकडे वळविणारा धोरणात्मक बदल दर्शवते, असे हिंडाल्को इंडस्ट्रीज लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक सतीश पै म्हणाले.
कंपनीने महिंद्र ॲण्ड महिंद्र लिमिटेडच्या विद्युत शक्तीवरील वाहनांना १०,००० ॲल्युमिनियम बॅटरी एन्क्लोजरचा पुरवठा केल्याची घोषणा देखील या निमित्ताने केली. महिंद्रासोबत सह-विकसित हे बॅटरी एन्क्लोजर पारंपारिक पोलाद धातूवर आधारीत घटकापेक्षा ४० टक्क्यांपर्यंत वजनाने कमी असून, वाहनाच्या चालन श्रेणीत यातून ८-१० टक्के सुधारणा, सुरक्षा वाढण्याबरोबरच, बॅटरी कूलिंगसाठी लक्षणीयरीत्या सुधारित तापमान व्यवस्थापन शक्य बनले आहे. अशा धर्तीच्या सुविधा अन्य ईव्ही निर्मात्यांच्या ओईएम पुरवठादारांसाठी देखील सुरू करण्याचे कंपनीचे नियोजन आहे.