लोकसत्ता व्यापार प्रतिनिधी

मुंबई: हिंडाल्को आगामी काळात त्यांच्या ॲल्युमिनियम, तांबे आणि विशेष ॲल्युमिना व्यवसायांमध्ये ४५,००० कोटी रुपयांची गुंतवणूक करेल, असे आदित्य बिर्ला समूहाचे अध्यक्ष कुमारमंगलम बिर्ला यांनी गुरुवारी स्पष्ट केले.

हिंडाल्कोसाठी नवीन नाममुद्रेच्या अनावरणासाठी आयोजित कार्यक्रमात बोलताना बिर्ला म्हणाले की, कंपनी एक परिवर्तनकारी शक्ती बनू इच्छिते आणि देशातील सर्वात मोठी ॲल्युमिनियम उत्पादक म्हणून ती पुढे येईल. ॲल्युमिनियम, तांबे आणि विशेष ॲल्युमिना व्यवसायांना आघाडीवर आणण्यासाठी पुढील पिढीतील, उच्च अचूकता अभियांत्रिकी उत्पादने वितरित करण्यासाठी ही गुंतवणूक करण्यात येणार आहे.

अल्युमिनियम, तांबे आणि ॲल्युमिना हे सौर मॉड्यूल आणि बॅटरी स्टोरेज उद्योगातील अविभाज्य घटक आहेत. शिवाय कंपनी त्यांच्या अक्षय्य ऊर्जा क्षमतेत १५० मेगावॅटची भर घालणार असून, यातून एकूण उत्पादन क्षमता ३५० मेगावॅटवर पोहोचेल, असे बिर्ला यांनी सांगितले. हिंडाल्को सध्या जगभरात ५२ प्रकल्प चालवत असून सुमारे ४७,००० लोकांना रोजगार देते.

कंपनीने ओडिशामध्ये ॲल्युमिनियम वितळवण्यासाठी १०० मेगावॅट क्षमतेच्या अक्षय्य ऊर्जा प्रकल्पाची सुरुवात केली आहे, ज्यामध्ये स्थिर, २४ तास वीज पुरवठ्यासाठी पवन, सौर आणि पंप केलेल्या जल साठवणूक असे संमिश्र स्रोतांचे संयोजन केले आहे. तसेच कंपनी ईव्ही मोबिलिटी, अक्षय्य ऊर्जा, ऊर्जा साठवणूक, सेमीकंडक्टर आणि उच्च दर्जाचे इलेक्ट्रॉनिक्स यासह विविध क्षेत्रांमध्ये उपायांवर काम करत असल्याचे बिर्ला म्हणाले.

‘इस्रो’सोबत काम

कंपनी चांद्रयान आणि मंगळयानासाठी विशिष्ट उत्पादन घटकांवर ‘इस्रो’सोबत काम करत आहे. तसेच संरक्षण क्षेत्रासाठी हार्ड अलॉय उत्पादने देखील विकसित करत आहे. भारतातील पहिला ई-कचरा पुनर्वापर प्रकल्पही ती उभारत आहे, जो टाकून दिलेल्या उपकरणांमधून धातू काढतो आणि पुनर्वापर करतो, असे समूहाचे अध्यक्ष कुमार मंगलम बिर्ला म्हणाले.

Story img Loader