Hindenburg Report vs Adani Group : हिंडेनबर्गच्या ताज्या अहवालात सेबीच्या अध्यक्षा माधबी पुरी बूच यांना लक्ष्य करण्यात आलं आहे. अदाणी घोटाळ्याशी संबंधित असलेल्या दोन परदेशी फंडांमध्ये माधबी पुरी बूच यांची गुंतवणूक असल्याचा आरोप करण्यात आला आहे. दरम्यान, या वृत्तांमुळे अदानी समूहाचे शेअर्स कोसळले आहेत. हिंदूस्थान टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार जवळपास ७ टक्क्यांनी शेअर्स कोसळले आहेत. आठवड्याच्या सुरुवातीलाच ही घसरण झाल्याने गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले आहे.
अदाणी समूहाच्या कंपन्यांचे शेअर्स ७ टक्क्यांनी घसरल्याने गुंतवणूकदारांचा ५३ हजार कोटींचं नुकसान झालं आहे. कारण, अदाणींच्या १० कंपन्यांच्या शेअर्सचं एकत्रित बाजार भांडवल १६.७ लाख कोटींवर घसरले आहे.
अदाणी समूहाच्या कोणते शेअर्स किती टक्क्यांनी घसरले
- अदाणी एंटप्रायजेस – ३.५५ टक्के
- अदाणी पोर्ट्स अँन्ड एसईजेड – ४.८० टक्के
- अदाणी ग्रीन एनर्जी – ४.४७
- अदाणी एनर्जी सोल्युशन्स – ४१.६ टक्के
- अदाणी टोटल गॅस – ७.२२ टक्के
- अदाणी विल्मर – ४.७२ टक्के
हिंडेनबर्ग रिसर्चने त्यांच्या अहवालात नेमकं काय म्हटलंय?
एका जागल्याने दिलेल्या दस्तऐवजातून माहिती मिळाल्याचे हिंडनबर्गने नमूद केले आहे. त्यांनी असे लिहिले आहे की, ‘‘आपण आपले कामकाज सुरू ठेवल्यास, त्यामध्ये कोणताही गंभीर हस्तक्षेप होण्याची जोखीम नाही याचा अदाणींना वाटणारा संपूर्ण आत्मविश्वास आमच्या आधी लक्षात आला होता. त्यामुळे अदाणींचे माधवी बुच यांच्याशी असलेल्या संबंधांमधून त्याचा खुलासा मिळेल असे सूचित होत होते. तेव्हा आम्हाला माहित नव्हते की, माधवी बुच आणि त्यांचे पती धवल बुच यांचे त्याच बर्म्युडा आणि मॉरिशस फंडांमध्ये छुपे हिस्सेदारी होती, ज्यांचा वापर विनोद अदाणींनी (आर्थिक गैरव्यवहारांसाठी) केला होता. आम्ही अदाणींच्या भांडवली बाजारातील घोटाळ्याबद्दल १८ महिन्यांपूर्वी अहवाल प्रसिद्ध केला होता. त्याचा तपास करण्यात ‘सेबी’ने आश्चर्यकारकरित्या उत्साहाचा अभाव दाखवला होता’’ असे हिंडनबर्गने (Hindenburg Report) म्हटले आहे.
हेही वाचा >> Hindenburg : “…म्हणून सेबीने अदाणींच्या घोटाळ्याप्रकरणी कारवाई केली नाही”, हिंडेनबर्गचा आणखी एक धमाका
हिंडेनबर्गच्या आरोपांवर माधबी पुरी बूच यांचं स्पष्टीकरण काय?
माधबी पुरी हूच यांनी अदाणी घोटाळ्यात वापरण्यात आलेल्या दोन परदेशी फंडांमध्ये भागीदारी असल्याचा आरोप हिंडेनबर्गने शनिवारी केला. त्यामुळे सेबी अदाणी घोटाळ्यावर कारवाई करण्यास उत्सुक नसल्याचा दावाही करण्यात आला होता. हिंडेनबर्गच्या या आरोपांना निवदेनाद्वारे उत्तर देत बूच यांनी रविवारी आपली बाजू मांडली. अहवालात उल्लेख केलेल्या आयआयएफएल वेल्थ मॅनेजमेंटने प्रवर्तन केलेल्या फंडामधील गुंतवणूक सिंगापूरस्थित खासगी नागरिक म्हणून केली होती आणि सेबीचे पूर्ण वेळ सदस्य होण्यापूर्वी दोन वर्षे आधी केली होती, असे माधबी आणि धवल बूच यांनी स्पष्ट केले.
धवल बूच हे २०१९ पासून ब्लॅकस्टोनचे वरिष्ठ सल्लागार आहेत आणि ते त्या कंपनीच्या बांधकाम व्यवसायाशी संबंधित नाहीत. तसंच, माधबी बूच या २०१७ मध्ये सेबीच्या पूर्ण वेळ सदस्य झाल्यानंतर त्यांच्या दोन सल्लागार कंपन्या तातडीने निष्क्रिय झाल्या आहेत, असंही या निवेदनात म्हटलं आहे.