मुंबई : वेदान्त समूहातील कंपनी असलेल्या हिंदुस्तान झिंक लिमिटेडच्या संचालक मंडळाने मंगळवारी विद्यमान आर्थिक वर्षासाठी १९ रुपयांचा दुसऱ्या अंतरिम लाभांशाच्या वाटपाला मान्यता दिली. या लाभांशाच्या माध्यमातून भागधारकांमध्ये ८,०२८ कोटी रुपये वितरित केले जाणार आहेत. संचालक मंडळाने २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी दोन रुपये दर्शनी मूल्य असलेल्या समभागासाठी ९५० टक्के म्हणजेच प्रति समभाग १९ रुपये अंतरिम लाभांश मंजूर केला आहे. यासाठी कंपनीने २८ ऑगस्ट ही भागधारकांची पात्रता ठरविणारी ‘रेकॉर्ड तारीख’ निश्चित केली आहे.
आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये कंपनीने ५,४९३ कोटी रुपयांचा लाभांश जाहीर केला होता. केंद्र सरकारची हिंदुस्तान झिंकमध्ये २९.५ टक्के हिस्सेदारी आहे. परिणामी, केंद्र सरकारला १,६२२ कोटी रुपयांचा लाभांश प्राप्त झाला होता. त्याआधीच्या वर्षात म्हणजेच २०२२-२३ मध्ये कंपनीने ३२,००० कोटी रुपयांचा लाभांश दिला होता, त्या माध्यमातून केंद्र सरकारला ९,५०० कोटी रुपये मिळाले होते. हिंदुस्तान झिंक लिमिटेड ही जगातील दुसऱ्या क्रमांकाची एकात्मिक जस्त उत्पादक आणि तिसऱ्या क्रमांकाची चांदी उत्पादक कंपनी आहे. कंपनी तिची उत्पादने ४० हून अधिक देशांना पुरवते आणि भारतातील जस्त बाजारपेठेतील सुमारे ७५ टक्के बाजार हिस्सा कंपनीने व्यापला आहे.
हेही वाचा : Gold-Silver Price: सोने घसरणीनंतर किमतींमध्ये झाले मोठे बदल, पाहा मुंबई-पुण्यात काय सुरुये १० ग्रॅमचा भाव
समभागाची कामगिरी कशी?
कंपनीच्या समभागाच्या बाजारभावानुसार, कंपनीचे २,१६,५६८ कोटी रुपयांचे बाजार भांडवल असून कंपनी बीएसई २०० निर्देशांकाचा एक घटक आहे. हिंदुस्तान झिंकच्या समभागांनी कॅलेंडर वर्षात आतापर्यंत ६०.४३ टक्के परतावा दिला आहे. हिंदुस्तान झिंकचा समभाग गेल्या सहा महिन्यांत ६४.१९ टक्के आणि गेल्या वर्षी ६२.४४ टक्क्यांनी वधारला होता. मात्र, गेल्या एका आठवड्यात त्यात १२.०१ टक्क्यांनी आणि गेल्या एका महिन्यात २०.११ टक्क्यांनी घसरण झाली आहे.