GST Revenue Collection : नव्या आर्थिक वर्षाच्या पहिल्याच महिन्यात म्हणजे एप्रिलमध्ये जीएसटी संकलनाने मागचे सर्व रेकॉर्ड मोडीत काढले आहेत. एप्रिल २०२३ मधील GST संकलनाच्या आकडेवारीने इतिहास रचला आहे. एप्रिलमध्ये जीएसटी संकलन १.८७ लाख कोटी रुपये झाले आहे, जो आतापर्यंतचा ऐतिहासिक विक्रम आहे. आकडेवारीनुसार, एप्रिलमध्ये एकूण १,८७,०३५ कोटींच्या GST संकलनात CGST संकलन ३८,४४० कोटी रुपये, SGST संकलन ४७,४१२ कोटी रुपये, IGST ८९,१५८ कोटी रुपये आणि उपकर म्हणून १२,०२५ कोटी रुपये सरकारी तिजोरीत जमा करण्यात आले आहेत.
मार्च २०२३ मध्ये देशातील जीएसटी संकलन १,६०,१२२ कोटी रुपये होते. गेल्या वर्षी एप्रिल २०२२ मध्ये जीएसटी संकलन १,६७,५४० कोटी रुपये होते. म्हणजेच गेल्या एप्रिलच्या तुलनेत या एप्रिलमध्ये जीएसटी संकलनात १९,४९५ कोटी रुपये अधिक जमा झाले आहेत. जीएसटी संकलनाचा डेटा जारी करताना वित्त मंत्रालयाने सांगितले की, एप्रिल २०२३ मध्ये जीएसटी संकलन गेल्या वर्षीच्या एप्रिल महिन्याच्या तुलनेत १२ टक्के जास्त आहे. २० एप्रिल २०२३ रोजी एका दिवसात ९.८ लाख व्यवहार झाले, ज्यामध्ये एका दिवसात ६८,२२८ कोटी रुपयांचा GST जमा झाला आहे. यापूर्वी एका दिवसात व्यवहाराचा विक्रम गेल्या वर्षी २० एप्रिल २०२२ रोजी होता, जेव्हा एका दिवसात ९.६ लाख व्यवहार झाले होते, ज्यामध्ये ५७,८४६ कोटी जीएसटी वसुली दिसली होती.
हेही वाचाः विश्लेषण: संजय राय शेरपुरिया यांच्या कंपनीकडून २ कोटी रुपयांच्या अनुदानाचा घोटाळा; नेमकं प्रकरण काय?
विक्रमी जीएसटी संकलनावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट केलेय. भारतीय अर्थव्यवस्थेसाठी ही खूप मोठी बातमी आहे. कमी कर दर असूनही कर संकलनात झालेली विक्रमी वाढ जीएसटी एकात्मता आणि अनुपालनामध्ये कशी यशस्वी झाली आहे हे दर्शवत असल्याचंही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विटमधून अधोरेखित केलं आहे. मात्र, जीएसटी संकलन १.७५ लाख कोटींच्या पुढे जाण्याची ही पहिलीच वेळ आहे. मार्च २०२३ मध्ये ९ कोटी ई-वे बिले व्युत्पन्न झाली, तर फेब्रुवारीमध्ये ८.१ कोटी ई-वे बिले व्युत्पन्न झाली. एप्रिल महिन्यातील केंद्र आणि राज्य सरकारच्या महसुलावर नजर टाकल्यास नियमित सेटलमेंटनंतर केंद्राचा महसूल ८४,३०४ कोटी रुपयांचा सीजीएसटी आहे, तर राज्यांसाठी एसजीएसटी ८५,३७१ कोटी रुपये आहे.
हेही वाचाः अमेरिकेतील आणखी एक बँक बंद; जे पी मॉर्गन आता फर्स्ट रिपब्लिक बँकेची संपत्ती ताब्यात घेणार