पीटीआय, नवी दिल्ली

सार्वजनिक क्षेत्रातील आघाडीची बँक असलेल्या पंजाब नॅशनल बँकेने (पीएनबी) गुरुवारी गृहकर्ज आणि वाहन कर्जांसह किरकोळ कर्जावरील व्याजदरात २५ आधारबिदूंची कपात करण्याची घोषणा केली. येत्या १० फेब्रुवारीपासून नवीन दर लागू झाले आहेत.

रिझर्व्ह बँकेने सुमारे पाच वर्षांच्या कालावधीनंतर, विद्यमान महिन्यात ७ फेब्रुवारीला रेपो दरात पाव टक्क्यांची कपात करून तो ६.२५ टक्क्यांवर आणला आहे. त्यानंतर खासगी आणि सावर्जनिक क्षेत्रातील बँकाकडून कर्जाचे दर कमी करण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत होती. त्याला अनुसरून आता पंजाब नॅशनल बँकेने कर्जावरील दर कमी केल्यामुळे गृहकर्ज, वाहन कर्ज, शिक्षण आणि वैयक्तिक कर्ज यासह विविध कर्जदर कमी होणार असून कर्जदारांनादिलासा मिळेल.

दर कपातीनंतर, पीएनबीचा गृहकर्जाचा दर ८.१५ टक्के झाला आहे. ग्राहकांना ३१ मार्च २०२५ पर्यंत अग्रीम प्रक्रिया शुल्क आणि कागदपत्र शुल्क पूर्णपणे माफ करण्याचा फायदा घेता येणार असल्याचे बँकेकडून सांगण्यात आले. गृहकर्ज योजनेत वार्षिक ८.१५ टक्क्यांपासून सुरू होणारा व्याजदर आणि प्रति लाख ७४४ रुपये ईएमआय असेल. वाहन कर्ज देखील ८.५० टक्क्यांपासून उपलब्द असून त्यावर प्रति लाख १,२४० रुपये ईएमआय असेल. शैक्षणिक कर्जाच्या बाबतीत, किमान दर ७.८५ टक्के प्रतिवर्ष करण्यात आला आहे. तसेच ग्राहकांना डिजिटल प्रक्रियेद्वारे २० लाख रुपयांपर्यंतचे वैयक्तिक कर्ज मिळू शकते, त्यावरील सुधारित दर आता ११.२५ टक्क्यांपासून सुरू होत आहे. या महिन्याच्या सुरुवातीला, स्टेट बँकेने रिझर्व्ह बँकेच्या रेपो दर कपातीनंतर गृहकर्जासह किरकोळ कर्जांवरील व्याजदर २५ आधारबिदूंनी कमी केले होते.

Story img Loader