मुंबई: रिझर्व्ह बँकेने अलिकडेच केलेल्या रेपो दर कपातीला प्रतिसाद म्हणून, गृहवित्त क्षेत्रातील एलआयसी हाऊसिंग फायनान्स आणि सार्वजनिक क्षेत्रातील इंडियन बँक यांनी त्यांच्या कर्जदरात प्रत्येकी २५ आधार बिंदूंची अर्थात पाव टक्क्यांच्या कपातीची शुक्रवारी घोषणा केली.एलआयसी हाऊसिंगने सर्व प्रकारच्या कर्जासाठी मानदंड असलेल्या प्रधान ऋण दरात (एलएचपीएलआर) ही कपात करून तिचे गृहकर्ज अधिक परवडणारे बनविताना, विद्यमान आणि नवीन कर्जदारांना त्याचा फायदा देऊ केला आहे. सुधारित गृहकर्ज व्याजाचे दर आता ८ टक्क्यांपासून सुरू होतील आणि ते २८ एप्रिलपासून लागू होतील, असे कंपनीने निवेदनांत म्हटले आहे.

दुसरीकडे, इंडियन बँकेने गृहकर्जावरील व्याजदर सध्याच्या ८.१५ टक्क्यांवरून ७.९० टक्के आणि वाहन कर्ज व्याजदर सध्याच्या ८.५० टक्क्यांवरून ८.२५ टक्के अशा किमान पातळीवर आणले आहेत. चेन्नईत मुख्यालय असलेल्या बँकेकडून फेब्रुवारीमध्येही अशीच कपात करण्यात आली होती.

कमी केलेल्या व्याजदरांव्यतिरिक्त, इंडियन बँकेने सवलतीतील प्रक्रिया शुल्क आणि शून्य कागदपत्र शुल्कासारखे फायदे देखील घरखरेदीस इच्छुकांना देऊ केले आहेत. ग्राहकांसाठी सुलभ आणि अनुकूल वित्तपुरवठ्याचा पर्याय प्रदान करण्याच्या इंडियन बँकेच्या वचनबद्धतेलाच हा निर्णय प्रतिबिंबित करतो, असे बँकेने निवेदनात म्हटले आहे.