वृत्तसंस्था, टोक्यो
जपानी वाहन उत्पादक होंडा, निसान आणि मित्सुबिशी यांनी व्यवसाय विलीनीकरणाबाबत चर्चा ही फारकतीच्या निर्णयासह गुरुवारी संपुष्टात आणली. तीनही आघाडीच्या वाहन उत्पादक कंपन्यांनी हा करार रद्द करण्यास सहमती दर्शविली, असे त्यांच्या संयुक्त निवेदनात म्हटले आहे.

जपानी वाहन निर्मात्या निसान आणि होंडाच्या संचालक मंडळांनी गुरुवारी स्वतंत्रपणे झालेल्या बैठकांतून विलीनीकरणाची चर्चा अधिकृतपणे संपुष्टात आणण्याच्या बाजूने कौल दिला. जर ठरल्याप्रमाणे हे विलीनीकरण सफल झाले असते तर टोयोटा, फोक्सवॅगन आणि ह्युंदाईनंतर वाहन विक्रीच्या बाबतीत जगातील चौथा सर्वात मोठा स्पर्धक यातून पुढे आला असता.

होंडा मोटर कंपनी आणि निसान मोटर कॉर्पने डिसेंबरमध्ये संयुक्त कंपनी स्थापन करण्याबाबत करण्यासाठी चर्चा सुरू केली होती. शिवाय मित्सुबिशी मोटर्स कॉर्प देखील त्या गटात सामील होण्याबाबत उत्सुक होती. तथापि वाढत्या मतभेदांसह, वाटाघाटींमध्ये गुंता निर्माण झाल्यानंतर जपानची तिसरी सर्वात मोठी वाहन निर्माता कंपनी निसानने, तिची मोठी प्रतिस्पर्धी होंडासोबतच्या चर्चेतून माघार घेतली. होंडाने निसानला तिची उपकंपनी बनवण्याचा प्रस्ताव दिला होता. ताज्या घडामोडीवर कंपन्यांच्या प्रतिनिधींनी भाष्य करण्यास नकार दिला.

निसान आणि होंडा दोघांनीही जागतिक पातळीवर चिनी कंपनी बीवायडी आणि इतर काही उत्पादक कंपन्यांशी तीव्र स्पर्धेला सामोरे जावे लागत आहे. त्यावर तोडगा म्हणून हा विलीनीकरणाचा प्रयत्न सुरू होता. निसान आता नवीन भागीदारांसोबत काम करण्यास उत्सुक असून, ज्यामध्ये तैवानचा फॉक्सकॉनचा समावेश आहे, असे सूत्रांनी सांगितले. फॉक्सकॉनचे अध्यक्ष यंग लिऊ यांनी देखील याबाबत सकारात्मकता दर्शवली आहे.

Story img Loader