मुंबई : रिझर्व्ह बँकेकडून पतधोरणात नरमाईची भूमिका घेतली जाण्याच्या आशेने प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टीने गुरुवारी १ टक्क्यांपर्यंत झेप घेतली. अमेरिकी बाजारातील तेजी आणि माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील समभागांमध्ये झालेल्या खरेदीने निर्देशांकांची दौड सलग पाचव्या सत्रात कायम आहे.
गुरुवारी दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ८०९.५३ अंशांनी म्हणजेच १ टक्क्याने वधारून ८१,७६५.८६ पातळीवर स्थिरावला. दिवसभरात, त्याने १,३६१.४१ अंशांची उसळी घेत ८२ हजारांपुढे मजल मारली होती. ८२,३१७.७४ ही त्याची सत्रातील उच्चांकी पातळी होती. मात्र गुंतवणूकदारांनी अखेरच्या तासात नफावसुलीला प्राधान्य दिल्याने ८२,००० पातळी टिकवून ठेवण्यास सेन्सेक्स अपयशी ठरला. गेल्या पाच सत्रात सेन्सेक्सने २,७२२.१२ अंश म्हणजेच ३.४४ टक्क्यांची कमाई केली आहे. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये २४०.९५ अंशांची वाढ झाली आणि तो २४,७०८.४० पातळीवर बंद झाला.अमेरिकी भांडवली बाजारात डाऊ निर्देशांक प्रथमच ४५,००० पातळीच्या पुढे झेपावला आहे. हे अमेरिकी बाजारातील तेजीचे सूचक असून, तेथील घसरण सुरू असलेली महागाई आणि वाढत्या विकासदरामुळे आगामी काळातदेखील ही तेजी कायम राहण्याची शक्यता आहे. शिवाय अमेरिकी अर्थव्यवस्था चांगल्या स्थितीत असल्याचे फेडरल रिझर्व्हचे अध्यक्ष जेरॉम पॉवेल यांच्या वक्त्यव्याने तेजीवाल्यांना अधिक बळ मिळाले, असे मत जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे मुख्य गुंतवणूक धोरणकार व्ही. के. विजयकुमार यांनी व्यक्त केले.
हेही वाचा – ‘ईपीएफओ’ची समभागसंलग्न गुंतवणूक २४.७५ लाख कोटींवर
सेन्सेक्समध्ये टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, टायटन, इन्फोसिस, भारती एअरटेल, बजाज फायनान्स, आयसीआयसीआय बँक, एचसीएल टेक्नॉलॉजीज आणि टेक महिंद्र यांचे समभाग तेजीत होते. तर एनटीपीसी आणि एशियन पेंट्सच्या समभागात घसरण झाली.पतधोरणात व्याजदराबाबत आज निर्णयरिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या अध्यक्षतेखालील पतधोरण समितीच्या बैठकीला ४ तारखेपासून सुरुवात झाली असून, शुक्रवारी बैठकीचे निर्णय जाहीर केले जातील. वाढती महागाई आणि घसरलेला विकासदर यामुळे व्याजदर कपातीबाबत रिझर्व्ह बँक काय निर्णय घेणार याकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे. तूर्त दरकपात नाही केली गेली तरी बँकांना अधिक निधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने रोख राखीव प्रमाणात (सीआरआर) कपातीची शक्यता विश्लेषकांनी व्यक्त केली आहे. या शक्यतेमुळेच गुरुवारच्या सत्रात भांडवली बाजारात उत्साही खरेदीने निर्देशांकांनी मोठी झेप घेतल्याचे दिसून आले.
हेही वाचा – ‘निष्क्रिय बँक खात्यां’सदर्भात नियम शिथिलतेचे स्टेट बँकेची मागणी
सेन्सेक्स ८१,७६५.८६ ८०९.५३ (१%)
निफ्टी २४,७०८.४० २४०.९५ (०.९८%)
डॉलर ८४.७२ – ३ पैसे
तेल ७२.६८ ०.५३