पुणे : होरिबा इंडियाने चाकण येथील तांत्रिक केंद्रामध्ये हायड्रोजन इंधनावरील वाहनांच्या इन्टर्नल कम्बशन इंजिनची चाचणी सुविधा सुरू केली आहे. कंपनीने ही सुविधा उभारण्यासाठी सुमारे ३० कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. या सुविधेचे उद्घाटन होरिबा एनर्जी अँड एनव्हायर्न्मेंटचे कार्यकारी कॉर्पोरेट अधिकारी डॉ. जॉर्ज गिलेस्पी व होरिबा लिमिटेड जपानचे कॉर्पोरेट अधिकारी आणि होरिबा इंडियाचे अध्यक्ष डॉ. राजीव गौतम यांच्या उपस्थितीत झाले. ही सुविधा पर्यावरणपूरक हायड्रोजन इंधनावरील वाहनांच्या इन्टर्नल कम्बशन इंजिनच्या चाचण्यांना गती देण्यासाठी निर्माण करण्यात आली आहे.
हेही वाचा : विकासदर अंदाजाला ‘एडीबी’कडूनही ६.५ टक्क्यांपर्यंत कात्री
कंपनीने ही सुविधा उभारण्यासाठी सुमारे ३० कोटी रुपयांची गुंतवणूक केली असून, या सुविधेमध्ये ३८० किलोवॉट क्षमतेपर्यंतच्या इंजिनांच्या चाचणीसाठीची उपकरणे उपलब्ध आहेत. यावेळी बोलताना डॉ. राजीव गौतम म्हणाले की, या अत्याधुनिक सुविधेमध्ये होरिबाची गुंतवणूक ही कंपनीच्या ‘मेक इन इंडिया’ उत्पादने व सेवांसह शाश्वत भविष्याबद्दलची कटिबद्धता दर्शवते. तसेच या सुविधेचे उद्घाटन हे देशातील वाहन उद्योगात पर्यावरणीय दृष्टिकोनातून क्रांती घडविण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे.