गुंतवणुकीचे नवीन पर्याय उपलब्ध होत असल्याने बँकेतील मुदत ठेवींच्या पारंपरिक पर्यायाकडील कल दिवसेंदिवस कमी होत असला तरी सर्वाधिक बचत आकर्षित करणारा पर्याय म्हणून त्याचा वरचष्मा कायम आहे. स्टेट बँकेच्या अहवालानुसार, घरगुती बचतीमध्ये बँकांतील मुदत ठेवींचे प्रमाण २०२१ मध्ये ४७.६ टक्के होते. हे प्रमाण २०२३ मध्ये कमी होऊन ४५.२ टक्क्यांवर घसरले आहे. याचवेळी घरगुती बचतीमध्ये आयुर्विम्याचे प्रमाण वाढले आहे. हे प्रमाण २०२१ मध्ये २०.८ टक्के होते, ते २०२३ मध्ये २१.५ टक्क्यांवर पोहोचले आहे. तसेच म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणुकीचे प्रमाण २०२१ मधील ७.६ टक्क्यांवरून २०२३ मध्ये ८.४ टक्क्यांवर पोहोचले आहे.
हेही वाचा >>> वाई वाहतूक क्षेत्रात अदानी समूहाच्या विस्ताराला बळ; ‘एअर वर्क्स’ कंपनीच्या संपादनाची घोषणा
उपलब्ध वित्तीय साधनांचा वापर करून जास्तीत जास्त परतावा मिळविण्याबाबत नागरिकांमध्ये जागरूकता वाढली आहे, असे अहवाल नमूद करतो. बरोबरीने बचतीचे प्रमाण वाढत असल्याचेही दिसून येत आहे. घरगुती बचतीमध्ये निव्वळ वित्तीय साधनां बचतीचे प्रमाण २०१४ मध्ये ३६ टक्के होते आणि ते २०२३ मध्ये ५२ टक्क्यांवर पोहोचले आहे. याचवेळी भौतिक साधनांत (सोने, जमीनजुमला) पैसा गुंतवरण्याचे प्रमाण याच काळात घटत आले आहे, असे अहवाल सांगतो.
जागतिक सरासरीपेक्षा चांगली कामगिरी
देशातील एकूण बचतीचा दर ३०.२ टक्के आहे. याचवेळी बचतीचा जागतिक सरासरी दर २८.२ टक्के आहे. यामुळे जागतिक सरासरीपेक्षा देशाचा बचत दर जास्त आहे. यातून देशातील बचतीची सवय समोर आली आहे. देशातील आर्थिक समावेशनाच्या पावलांमुळे बचतीचा दर वाढला आहे. सध्या देशातील ८० टक्के प्रौढांची बँकेत खाती आहेत. २०२१ पर्यंत हे प्रमाण सुमारे ५० टक्के होते, असे स्टेट बँकेच्या अहवालाने म्हटले आहे.