What is FD Laddering : गेल्या काही दिवसांपासून लोक गुंतवणुकीसाठी फिक्स डिपॉझिटची निवड करीत आहेत. मुदत ठेव (FD) हा देशातील सर्वात लोकप्रिय सुरक्षित गुंतवणूक पर्यायांपैकी एक ठरला आहे. बँका निश्चित व्याजानुसार एफडीवर परतावा देतात आणि संपूर्ण कार्यकाळात तो जैसे थेच राहतो. यामध्ये बाजारातील चढउतारांचा आपल्या मुदत ठेव रकमेवर कोणताही परिणाम होत नाही. म्हणजे त्यात गुंतवणूक करणाऱ्यांना हमी परतावा मिळतो. परंतु बऱ्याचदा अचानक उद्भवलेल्या परिस्थितीमुळे एफडी मुदतपूर्तीपूर्वी मोडावी लागते, ज्यामुळे परताव्यावर परिणाम होतो. FD मध्येच मोडल्याबद्दल काही दंडदेखील भरावा लागतो. अशा वेळी आपण FD लॅडरिंग लावण्याच्या तंत्राची मदत घेऊ शकतो, ज्याद्वारे FD वर जास्तीत जास्त परतावा मिळू शकतो, तोसुद्धा एफडी न मोडता.
बँक एफडी लॅडरिंग म्हणजे काय?
आपले भविष्य सुरक्षित करण्यासाठी आणि आपली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी स्मार्ट आर्थिक नियोजनाचे महत्त्व आपल्या सर्वांनाच माहीत असते. अलीकडे गुंतवणूकदारांमध्ये एफडी लॅडरिंग ही पद्धत पसंतीची ठरत आहे. नावाप्रमाणेच FD लॅडरिंग ही एक गुंतवणूक पॉलिसी आहे, ज्यामध्ये तुमची गुंतवणूक वेगवेगळ्या मुदतपूर्ती तारखांसह एकाधिक FD योजनांमध्ये विभागली जाते. सोप्या शब्दात सांगायचे झाल्यास हे एक टॉवर बनवण्यासारखे आहे, ज्यामध्ये प्रत्येक ठेव रक्कम वेगवेगळ्या वेळी परिपक्व होते.
म्हणजेच एफडी लॅडरिंग हे एक तंत्र आहे, ज्यामध्ये गुंतवणूकदारांना अनेक एफडी खाती उघडावी लागतात, ज्यांची मॅच्युरिटी वेगवेगळी असते. उदाहरणार्थ, जर तुमच्याकडे २० लाख रुपये असतील, जे तुम्हाला फिक्स डिपॉझिट करायचे असतील, तर आधी ते ५ वेगवेगळ्या भागात विभागून घ्या. आता प्रत्येक २ लाख रुपये FD योजनांमध्ये १ वर्ष, २ वर्षे, ३ वर्षे, ४ वर्षे आणि ५ वर्षांच्या मुदतीसह जमा करा. याद्वारे तुम्हाला वेळोवेळी पैसे मिळतील, जे तुम्ही तुमच्या गरजेनुसार खर्च करू शकता.
त्याचा फायदा असा आहे की, जर तुम्हाला यादरम्यान पैशांची गरज असेल तर तुम्हाला तुमची एफडी मोडावी लागणार नाही. दुसरीकडे जर पैशांची गरज नसेल, तर वेगवेगळ्या मुदतीची FD परिपक्व झाल्यावर ती वेगवेगळ्या मुदतीच्या FD मध्ये पुन्हा लॉक केली जाऊ शकते. तुमच्याकडे दीर्घ मुदतीसाठी एफडीचा अनुक्रमांक वाढलेला असेल आणि तुमच्यासाठी चांगली रक्कम तयार झालेली पाहायला मिळेल. आणखी एक फायदा म्हणजे वेळोवेळी FD वरील परतावा कुठे वाढत आहे याचे मूल्यांकन करणे सोपे जाईल. मॅच्युरिटी पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला जास्त व्याज देणाऱ्या बँकेच्या एफडीमध्ये ते पुन्हा जमा करण्याचा पर्याय उपलब्ध होईल.
तुम्हाला दरवर्षी परतावा मिळणार
एफडी लॅडरिंगचा हा फायदा खूप मोठा आहे. यामध्ये तुमची एफडी मॅच्युअर झाल्यावर तुम्हाला दरवर्षी म्हणजे १ वर्ष, २ वर्षे, ३ वर्षे, ४ वर्षे आणि ५ वर्षे परतावा मिळेल. जर तुम्हाला मॅच्युरिटीनंतर पैशांची गरज असेल, तर ते वापरा आणि उरलेले पैसे पुन्हा एफडीमध्ये टाका.
एफडी लॅडरिंग का करतात?
- उच्च व्याज कमाई
- व्याजदर वाढण्याच्या किंवा कमी करण्याच्या तणावातून मुक्त होता येते
- तोटा न करता तरलता मिळते
- लवचिकता
- जोखीम व्यवस्थापन
- दीर्घकालीन गुंतवणुकीची उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी
- कर बचतीसाठी
एफडी लॅडरिंग करण्यापूर्वी ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा
- तरलतेची गरज
- व्याजदर कुठे जास्त आहे?
- लवकर पैसे काढल्यास दंड
- कर नियम